संगमनेर-शासकीय कार्यालयात वैयक्तिक वाढदिवस साजरा करून नागरिकांच्या कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या तहसीलदार धीरज मांजरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल वाकचौरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रकात वाकचौरे यांनी म्हटले, की ३० जून रोजी तहसीलदार धीरज मांजरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी तो तहसील कार्यालयातच साजरा केला. या दिवशी सोमवार असल्यामुळे सप्ताहाचा पहिला कार्यदिवस होता. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शासकीय कामासाठी संगमनेर तहसील कार्यालयात आले होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने विविध संघटनांचे कार्यकर्ते, हितचिंतक, कंत्राटदार, मित्रपरिवार व लँड डेव्हलपर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक कार्यालयात उपस्थित होते. तहसीलदार मांजरे यांनी त्यांना कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यासाठी परवानगी दिली. परिणामी, कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली, त्यांना ताटकळत थांबावे लागले आणि कार्यालयीन कामकाजात खोळंबा झाला.
वैयक्तिक समारंभ शासकीय कार्यालयात साजरा करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नुसार अयोग्य असून अशा प्रकारे कार्यालयाचा वैयक्तिक वापर करणे ही प्रशासनाच्या शिस्तीचा भंग करणारी बाब आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मांजरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी निवेदनात केली आहे. याबाबत तहसीलदार मांजरे यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला परंतु मांजरे यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.