जगभरात हिंदू धर्माची ओळख केवळ भारतापुरती मर्यादित नाही, तर तो एक असा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक प्रवाह आहे ज्याने अनेक देशांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. गेल्या दोन शतकांत स्थलांतराच्या लाटा, ऐतिहासिक घडामोडी आणि सामाजिक बदल यामुळे भारताबाहेरही हिंदू धर्माने आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. विशेष म्हणजे, जगातील काही मुस्लिमबहुल देशांमध्येही हिंदू धर्मीयांची लक्षणीय उपस्थिती आहे, आणि ही गोष्ट अनेकांना आश्चर्यचकित करू शकते.
भारत

भारत ही हिंदू धर्माची जननी मानली जाते आणि आजही जगातील सर्वाधिक हिंदू भारतातच राहतात. एका प्रसिद्ध अहवालानुसार, 2020 मध्ये जगातील सुमारे 79 टक्के हिंदू भारतात होते. भारतात हिंदू धर्म केवळ एक धर्म नसून तो एक संपूर्ण जीवनपद्धती मानला जातो. त्यामुळे येथे हिंदू संस्कृतीचं अस्तित्व केवळ देवळांपुरतं सीमित नसून, ते उत्सव, आहार, पेहराव, परंपरा आणि नात्यांमध्येही खोलवर रुजलेलं आहे.
नेपाळ
भारताच्या खालोखाल नेपाळचा नंबर लागतो. नेपाळ हा एकमेव असा देश आहे जिथे हिंदू धर्म अधिकृत राष्ट्रीय धर्म म्हणून ओळखला गेला होता आणि आजही तेथील सुमारे 81 टक्के लोक हिंदू आहेत. येथेही धर्माची मुळे खोलवर रुजलेली असून, पशुपतिनाथ मंदिरासारख्या पवित्र स्थळांमुळे नेपाळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. भारत व नेपाळ हे दोनच देश आहेत जिथे हिंदू धर्म बहुसंख्यांमध्ये आहे.
पाकिस्तान, UAE आणि बांग्लादेश
पण खरेच ज्या गोष्टी आश्चर्यचकित करतात, त्या म्हणजे काही मुस्लिमबहुल देशांमधील हिंदू लोकांची उपस्थिती. उदाहरणार्थ, युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये सुमारे 1.1 दशलक्ष हिंदू राहतात. ही संख्या स्थानिक लोकसंख्येच्या तुलनेत मोठी असून, मुख्यतः भारत, नेपाळ आणि बांगलादेशातून गेलेल्या कामगारांमुळे हे शक्य झालं आहे. याचप्रमाणे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही हिंदू समाज अस्तित्वात आहे. पाकिस्तानमध्ये मुख्यतः सिंध प्रांतात, तर बांगलादेशात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये हिंदू राहतात. मात्र, या दोन्ही देशांमध्ये वर्षानुवर्षे हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येतं.
अमेरिका आणि UK
अमेरिका आणि युनायटेड किंगडमसारख्या पश्चिमी देशांमध्येही हिंदू धर्माचा प्रभाव वाढलेला आहे. अमेरिकेत सुमारे 3 दशलक्ष हिंदू असून, तेथे मंदिरांची संख्या वाढत आहे, तसेच भारतीय सण आणि परंपरांचा मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. यूकेमध्येही जवळपास 1.1 दशलक्ष हिंदू असून, लंडनसारख्या शहरांमध्ये त्यांनी आपली एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे.
मलेशिया आणि सिंगापूर
याशिवाय, मलेशिया आणि सिंगापूरसारख्या आग्नेय आशियातील देशांमध्येही हिंदू धर्मीय समाज कार्यरत आहे. अनेक वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी येथे व्यवसाय, शिक्षण, आणि राजकारणातही आपले योगदान दिले आहे. मॉरिशससारख्या लहानशा बेटावरही आज जवळपास 48 टक्के लोक हिंदू आहेत. तिथेही हिंदू धर्म फक्त परंपरा नाही, तर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्व बनून राहिलेला आहे.
तरीही काही देशांमध्ये विशेषतः दक्षिण आशियामध्ये हिंदूंचं प्रमाण हळूहळू घटताना दिसतं. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हा घटाचा कल स्पष्ट दिसतो. यामागे अनेक कारणं आहेत. उदा. इतर धर्मीय लोकांच्या तुलनेत लोकसंख्यावाढीचा दर कमी असणं, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमुळे होणंरं अंतर्गत स्थलांतर, तसेच काही वेळा धार्मिक तणाव देखील.
आजच्या काळात, हिंदू धर्म जरी वेगवेगळ्या देशांत अल्पसंख्यांक असला, तरीही त्याची संस्कृती, परंपरा, आणि जीवनशैली जगभरात वेगवेगळ्या रूपात फुलताना दिसते.