शिर्डी : प्रवरेच्या सहकार भूमीत “वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची” या संकल्पनेतून डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने आयोजिलेला अध्यात्मिक सोहळा हे शिक्षण आणि संस्कृतीचे सुंदर संमेलन ठरले. टाळ-मृदुंगाच्या निनादात, जयघोषाच्या गजरात विद्यार्थ्यांनी साकारलेली वारी आणि उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लोणीत साक्षात पंढरपूर अवतरल्याचा अनुभव मिळाला. सहकार आणि ज्ञानाच्या पंढरीत खऱ्या अर्थाने “अवघा रंग एक झाला” याचे दर्शन घडले.
आषाढी एकादशीनिमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकाराने या अध्यात्मिक आणि सांस्कृक्तिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावागावातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सकाळपासूनच सहभाग घेत, लोणी गावातील प्रमुख मार्गावरून सुरु झालेली दिडी रिंगण सोहळ्याच्या मैदानाकडे निघाली.

विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्वजण रिंगण सोहळ्याच्या मैदानात पोहोचले. उन्हाचा तडाखा आणि पावसाच्या सरी झेलतही सर्व वारकरी दिंडीत रंगून गेले होते. विठू नामाचा जयघोष करत सैनिकी शाळेसमोरील मैदानावर दाखल होताच वातावरण एकदम भक्तिमय झाले.
या दिंडीत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी मंत्री अण्णासाहेब मास्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या विश्वस्त सुवर्णा विखे पाटील आणि डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वारकरी संप्रदायात दिलेले योगदान प्रसिद्ध आहे. त्याच विचारधारेवर चालत प्रवरा परिवार अध्यात्मिक वाटचाल पुढे नेत आहे, असा विश्वास डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोणीत रंगला सोहळा
डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी सांगितले की, वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवरेची या संकल्पनेतून नव्या पिढीला आषाढी वारीचे महत्व समजावे हा उद्देश होता. मागील १५ दिवसांपासून या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सुरू होती. विद्यार्थ्यांना अभंग, टाळ-मृदुंगाचे ताल, रिंगण सोहळा आणि पाऊली यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेता आला.
साकारले प्रतीपंढरपूरघोड्यांचा सहभाग असलेला रिंगण सोहळा, नाचवले जाणारे भगवे झेंडे आणि दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत, यामुळे उपस्थितांना पंढरपूरच्या वारीचा खरा अनुभव मिळाला. व्यासपीठावर मंत्री विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांची फुगडी, तसेच डॉ. सुजय विखे पाटील आणि पोलीस अधीक्षक घार्गे यांची फुगडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.