Ahilyanagar News : पुणतांबा येथील रामपूरवाडी रोडलगत असणाऱ्या थोरात वस्ती, म्हसोबावाडी, रेल्वे पुलाजवळ, चव्हाण वस्ती या परिसरात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र घबराट निर्माण झाली आहे.
मागील आठ दिवसांपासून बिबट्या सतत ठिकाणे बदलत असून काही दिवसांपूर्वी रामपूरवाडी रोडवरील कै. सावित्राभाऊ थोरात यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास दिसून आला. बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट असून, वस्तीवरील कुत्रे भुंकल्यानंतर त्यानेतेथून पलायन केले.

त्यानंतर तो रामपूरवाडी रेल्वे पुलाजवळही नागरिकांच्या निदर्शनास आला. म्हसोबावाडी येथे एका कुत्र्याचा फडशा पाडण्यात आला. काही दिवसांपूर्वी चव्हाण वस्तीवरील पाराजी वरखड यांच्या वस्तीवरही बिबट्याचे दर्शन झाले होते. या सर्व घटनांमुळे पुणतांबा परिसरातील नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत शेतकरी भास्कर मोटकर यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क करून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने सापळा लावून पिंजरा बसवण्याची विनंती केली. त्यांनी कोपरगाव व राहाता वन्य अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे या घटनांची माहिती दिली. तथापि वन अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जर एखाद्या नागरिकाचा, विद्यार्थ्यांचा किंवा शेतकऱ्याचा जीव गेला, तर याची जबाबदारी शासकीय अधिकारी घेणार का? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.