शनिवार दिनांक ५ जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मारुती रिट्स व एका दुचाकीची श्रीरामपूर-नेवासा रोडवरील पुनतगाव फाट्यानजीक समोरासमोर धडक होऊन दोन जण जागेवर ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, विक्रम भीमा आढाव (रा. शिरसगाव, ता. येवला, जि. नाशिक) हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव, ता. नेवासा येथे स्वतः करिता सेकंड हँड कार पाहण्यासाठी श्रीरामपूरकडून नेवासाकडे येत असताना पुनतगाव फाट्याजवळ नेवासाकडून एका मोटार सायकलवर तिघेजण भरधाव वेगाने येत असताना मोटार सायकल घसरून पडल्याने ती कारखाली आली.

यात दुचाकीवरील दोघे जण कारखाली चिरडले गेले तर पाठीमागे बसलेला तिसरा इसम बाजूला फेकला गेला. कार चालकाने कार थांबवून पाहिले असता दोघेजण गंभीर जखमी झालेले होते. कार चालक विक्रम भीमा आढाव याने आपल्या दोन्ही मित्रांसह रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला हात करून पोलीस ठाण्यात आले व पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन पवार यांना संपर्क करून तातडीने घटनास्थळी पाठवले. त्यांनी जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नेवासा येथे भरती केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
मृतांमध्ये अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे (वय ३२ ) व निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (वय ५६, दोघे रा. पुनतगाव, ता. नेवासा) यांचा समावेश असून मोटारसायकलवर बसलेला तिसरा व्यक्ती किरकोळ जखमी झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी फौज फाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेच्या अनुषंगाने नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे अमोल पवार करीत आहेत.