Maharashtra News : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वाहतुकीच्या क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. रेल्वेमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. देशात लवकरच बुलेट ट्रेन देखील धावताना दिसणार आहे. आगामी काळात वाऱ्याच्या वेगाने धावणारी हायपरलूप ट्रेन देखील भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर ठिकठिकाणी रोपवे सुरू केले जात आहेत.
याशिवाय देशात आता इलेक्ट्रिक बसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर दिसत आहेत. रस्त्यांचे नेटवर्क देखील विस्तारित केले जात आहेत. अशातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतातील वाहतूक क्षेत्र लवकरच एका नवीन युगात प्रवेश करणार असा विश्वास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी भविष्यातील प्रवास व्यवस्थेसाठी एक महत्त्वाकांक्षी ब्लूप्रिंट तयार केली आहे, ज्यामध्ये हायपरलूप, इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, केबल बस, रोपवे आणि फ्युनिक्युलर रेल्वेसारखे अत्याधुनिक पर्याय समाविष्ट राहणार आहेत. यामुळे भविष्यात देशातील नागरिकांना जलद आणि सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था देखील बदलणार
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या मते भारताची वाहतूक व्यवस्था मोठ्या परिवर्तनातून जात आहे. त्यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, शहरी भागातील वाहतूक आणि गर्दीची समस्या सोडवण्यासाठी आता देशात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केले जात आहे.
या सोबतच ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था देखील बदलली जाणार आहे. दुर्गम ग्रामीण आणि डोंगराळ भागात रोपवे, केबल कार आणि फ्युनिक्युलर रेल्वेसारखे प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, केदारनाथसह 360 ठिकाणी असे प्रकल्प नियोजित आहेत, त्यापैकी 60 ठिकाणी काम सुरू झाले आहे.
यातील, फ्युनिक्युलर रेल्वे ही एक अशी अनोखी प्रणाली आहे जी की लिफ्ट आणि रेल्वे तंत्रज्ञानाचे संयोजन करते, ज्यामुळे उंच ठिकाणी प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक देखील शक्य होणार आहे. हे तंत्रज्ञान डोंगराळ भागांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जात आहे.
इलेक्ट्रिक बसेस मध्ये विमानासारख्या सोयीसुविधा
याशिवाय गडकरी यांनी देशात अशा इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणारा आहेत ज्यामध्ये विमानासारख्या सोयी सुविधा राहतील असे सुद्धा म्हटले आहे. या अंतर्गत नागपूरमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून 135 लोकांची आसन क्षमता असलेल्या आधुनिक इलेक्ट्रिक बससाठी निविदा जारी करण्यात आली आहे.
या बसमध्ये केवळ एक्झिक्युटिव्ह क्लास सीट्सच नसतील तर एअरलाइन ग्रेड सुविधा आणि एसी देखील असतील. या बसचा वेग हा सरासरी 120 किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो.
सोबतच देशातील 11 प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या, ज्यात टाटा, टोयोटा, ह्युंदाई आणि महिंद्रा यांचा समावेश आहे, या कंपन्या आता फ्लेक्स-फ्युएल इंजिनवर काम करत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.
फ्लेक्स-फ्युएल इंजिनवर काम करणारी ही वाहने इथेनॉल, मिथेनॉल आणि पेट्रोल-डिझेल सारख्या पारंपारिक इंधनांच्या मिश्रणावर चालतील, ज्यामुळे भारताचे इंधन आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास देखील मंत्री महोदयांनी व्यक्त केला आहे.