कधी खळखळून हसवणारा आणि कधी स्वतःच्या जीवनात संघर्ष करताना दिसणारा कपिल शर्मा आज पुन्हा एकदा चर्चेत आहे, पण यावेळी तो आपल्या विनोदामुळे नव्हे, तर आपल्या जबरदस्त फिटनेसमुळे चर्चेत आलाय. एकेकाळी वजन वाढल्याने टीकेचा सामना करणाऱ्या या विनोदी कलाकाराने अवघ्या 36 दिवसांत 11 किलो वजन कमी केलं आहे आणि हे सगळं कोणताही कठोर डाएट किंवा जिममध्ये प्रचंड घाम गाळून नाही, तर एका खास पण सोप्या नियमामुळे शक्य झालं.

कपिलचा हा नवा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण विचारत आहेत “काय केलं कपिलने?” याबाबत त्याच्या फिटनेस कोच योगेश भटेजाने सिक्रेट उघड केलंय. ‘21-21-21’ हे विशेष सूत्र कपिल शर्माने वापरलं. योगेशच्या मते, ही एक अशी पद्धत आहे जी शरीराचं आणि मनाचं दोन्ही प्रकारे ट्रान्स्फॉर्मेशन करते, तेही हळूहळू आणि सहजतेने.
शारीरिक हालचाल
या पद्धतीचा पहिला टप्पा आहे शरीराची हालचाल सुरू करणं. सुरुवातीचे 21 दिवस कपिलने कोणताही कठीण व्यायाम केला नाही. फक्त दररोज काही ना काही हालचाल जसं की स्ट्रेचिंग, फ्री हँड व्यायाम, चालणं किंवा साधा पीटी क्लाससारखा वॉर्मअप. या टप्प्यात शरीराला हलवणं हाच उद्देश होता.
आहार
यानंतरचे दुसरे 21 दिवस कपिलच्या आहारावर लक्ष देण्यात आले. मात्र इथेही कोणताही कडक डाएट नाही. ना कॅलरी काउंट, ना कार्ब्स कटिंग. फक्त ‘कधी खायचं आणि काय खायचं’ याकडे लक्ष देण्यात आलं. वेळेवर अन्न, थोडा संतुलित खाण्याचा प्रयत्न आणि शरीराला पोषण देणाऱ्या सवयी एवढाच बदल करण्यात आला.
मानसिक तंदुरुस्ती
तिसरा टप्पा सर्वांत महत्त्वाचा होता मानसिक तंदुरुस्तीचा. या टप्प्यात कपिलने स्वतःच्या सवयींवर विचार केला. धूम्रपान, मद्यपान किंवा जास्त कॅफिनसारख्या व्यसनांपासून दूर राहणं आणि मानसिक स्वच्छता राखणं हे यामध्ये आलं. या टप्प्यात स्वतःची निरीक्षणं, बदल स्वीकारणं आणि नव्या शिस्तीकडे वळणं या सगळ्यांमुळे कपिलला केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही नवसंजीवनी मिळाली.
हे 21-21-21 दिवस संपून जेव्हा 63 वा दिवस आला, तेव्हा कपिलचे पूर्ण ट्रान्सफॉरमेशन दिसून आले.
त्याचं हे परिवर्तन केवळ त्याच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायक नाही, तर प्रत्येक सामान्य व्यक्तीला एक सकारात्मक संदेश देणारं आहे की फिटनेससाठी फार मोठा खर्च, कठोर डाएट किंवा तासनतास जिममध्ये वेळ घालवण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त शिस्तीची, सवयी बदलण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची.