शिर्डी- येथील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आणि इतर २० गुंतवणूकदारांनी मिळून तब्बल १ कोटी ६५ लाख ४ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर फक्त काही हप्ते मिळवून उर्वरित रक्कम न देता फसवणूक झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंतवणूकदारांनी विश्वासघात झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अनिल रामकृष्ण आहेर (वय ४५ वर्षे, रा. बन रोड, मातोश्रीनगर, शिर्डी) हे श्री साईबाबा संस्थानमध्ये वर्ग-४ कर्मचारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांनी समक्ष शिर्डी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली की, त्यांच्यासह संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या काही सहकाऱ्यांनी त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.

यामध्ये राजाराम भटू सावळे, सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे, संदीप भास्कर सावळे आणि भाऊसाहेब आनंदराव थोरात यांचा समावेश आहे. या चौघांनी अनिल आहेर यांना सांगितले की, राजाराम सावळे यांचा मुलगा भुपेंद्र राजाराम सावळे याची ‘ग्रो मोर इनव्हेस्टमेंट’ नावाची कंपनी असून तिथे गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळतो. कंपनी शिर्डी येथे असून ती नोंदणीकृत आहे, म्हणून कुठलाही धोका नाही, असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला.
दि. १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत हॉटेल केबीज ग्रँड शिर्डी येथे एक सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. त्याठिकाणी भुपेंद्र राजाराम सावळे, राजाराम भटू सावळे, पुजा गोकुळ पोटींडे, सुबोध पाटील उर्फ सावळे, संदीप सावळे, भाऊसाहेब थोरात आणि अरुण रामदास नंदन हे उपस्थित होते. या सात जणांनी प्रोजेक्टर स्क्रीनवर गुंतवणुकीविषयी माहिती दिली. कंपनी नोंदणीकृत असल्याचा दाखला दिला.
गुंतवणुकीचे लिखित करार करून दरमहा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावर विश्वास ठेवून अनिल आहेर यांनी ११ लाख ८८ हजार रुपये आरटीजीएसद्वारे कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांच्या पत्नी दिपाली आहेर यांच्याद्वारे २ लाख ९७ हजार, आणि भाऊ नानासाहेब आहेर यांच्या खात्यातून ३ लाख ९६ हजारांची गुंतवणूक करण्यात आली.
या गुंतवणुकीवर दरमहा ३ लाख १२ हजार, ७८ हजार आणि १ लाख ४ हजार रुपये परताव्याचे करार करण्यात आले होते. सुरुवातीला केवळ एक हप्ता दिला गेला. त्यानंतर गुंतवणूकदारांकडून सतत मागणी करूनही उर्वरित रक्कम परत करण्यात आली नाही. वारंवार विचारणा केल्यावर “आज-उद्या देतो’ असे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही रक्कम परत देण्यात आली नाही. यामुळे फसवणुकीची खात्री झाल्याने अनिल आहेर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादी अनिल आहेर यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ आणि आणखी १८ गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. यामध्ये राहूल डांगे, महेश डांगे, सिताराम डांगे, बाबासाहेब डांगे, विजय गुंजाळ, शरद शेळके, ज्योती राऊत, सुभाष लोखंडे, सोमेश्वर आगलावे, मिना निकम, दीपक तुरकणे, योगिता धरम, ज्योती धनावडे, विनोद धनावडे, सुरेश धारे, चंद्रकांत जाधव, प्रसादर जाधव आणि अर्चना जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून एकूण १ कोटी ६५ लाख ४ हजार रुपयांची गुंतवणूक केली असून त्यापैकी केवळ ४ लाख ९४ हजार रुपयांचा परतावा मिळाला आहे.
या प्रकरणी भुपेंद्र राजाराम सावळे, राजाराम भटू सावळे (दोघे रा. एअरपोर्टरोड शिर्डी), पुजा गोकुळ पोटींडे (रा. नाशिक), सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे, संदीप भास्कर सावळे (दोघे रा. नांदुर्खी रोड, शिर्डी), भाऊसाहेब आनंदराव थोरात (रा. जुना बिरोबा रोड, शिर्डी), आणि अरुण रामदास नंदन (रा. मगर हॉस्पिटल मागे, नाशिक) यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या सातही आरोपींनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून रक्कम उकळल्याचा ठपका फिर्यादीने ठेवला आहे.