अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

Published on -

भंडारदरा- अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आषाढ महिन्याच्या सरींचा जोर कायम असून, त्याचा थेट परिणाम भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढला असून, रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणात ७हजार ८१४ दलघफु जलसाठा नोंदवला गेला. धरण ७१.६९ टक्के भरले असून, सांडव्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पश्चिम घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या भातलागवडी रखडल्या असून, अनेकांची भात रोपे अजूनही पाण्याखालीच आहेत. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

रविवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे धरणात जलसाठा वाढल्याने, सांडव्यातून ७४८६ क्यूसेक आणि वीज निर्माण केंद्रातून ८४५ क्यूसेक असा एकूण ८३३१ क्यूसेक पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले. धरण पाणलोट क्षेत्रात सतत पावसाचा जोर असल्याने विसर्ग वाढविण्याची शक्यता भंडारदरा धरण शाखेकडून वर्तविण्यात आली आहे. धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपाय करण्यात येत आहे.

सध्याच्या पावसाच्या स्थितीवरून यावर्षी बऱ्याच वर्षांनंतर जुलै महिन्यातच भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, धरण शाखाधिकारी प्रवीण भांगरे आणि कर्मचारी पातळीवर देखरेख ठेवण्यात येत आहे.

धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने रंधा धबधब्यावर पाण्याचा प्रवाह वाढला असून, शनिवारी व रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. भंडारदरा आणि परिसरातील घाटघर, रतनवाडी, साम्रद यांसारख्या ठिकाणी धुक्यांमध्ये हरवलेल्या गावांमध्येही पर्यटकांनी भेट दिली.

मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासन किंवा पोलीस विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, हे विशेष. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी निळवंडे धरणात साठवले जात असल्याने त्याचा जलसाठाही ६१८९ दलघफुवर पोहोचला असून, धरण ७४.३२ टक्के भरले आहे. येथे वीज निर्मिती केंद्रातून ३०० क्यूसेसने पाणी प्रवरा नदीत सोडले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!