साकुरी- साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले की, नॅशनल हायवेने खोपडी व पाथरी दरम्यान पदयात्रींसाठी उभारलेल्या दोन इमारती अधिकृतपणे संस्थानकडे हस्तांतरित झाल्या नाहीत. इमारतींच्या हस्तांतरणासाठी संस्थानकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वर सिन्नर ते सावळीविहीर फाटा या मार्गाचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, टोल वसुलीही सुरू आहे. या मार्गावरून दरवर्षी हजारो साईभक्त पायी प्रवास करत शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या निवासासाठी नॅशनल हायवेने कोट्यवधी रुपये खर्च करून खोपडी व पाथरी दरम्यान दोन इमारती उभारल्या. मात्र, आजपर्यंत त्या इमारती साईबाबा संस्थानकडे अधिकृतपणे हस्तांतरित झाल्या नाहीत.

रामनवमीसारख्या मोठ्या सणाच्या वेळी काही दिवसांसाठी या इमारतींचा उपयोग भाविकांच्या निवासासाठी करण्यात आला; पण तांत्रिक अडचणींमुळे या इमारतींचा अधिकृत ताबा संस्थानकडे देण्यात आलेला नाही, अशी माहिती गोरक्ष गाडीलकर यांनी बोलताना दिली. मुंबई, नाशिक परिसरातून विविध वयोगटातील हजारो साईभक्त उन्हातान्हात, वाऱ्यावाऱ्यात अनवाणी पायी चालत शिर्डीत पोहोचतात.
त्यांच्या निवासासाठी या इमारती अतिशय उपयुक्त ठरू शकतात. संस्थानकडे इमारतींचा ताबा दिल्यास त्याठिकाणी मनुष्यबळासह अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साईबाबा संस्थान पूर्णपणे तयार आहे. या मुद्द्यावर साईबाबा संस्थानकडून वेळोवेळी नॅशनल हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असून, संस्थान भाविकांसाठी सुविधांच्या बाबतीत सदैव तत्पर आहे. या इमारती हस्तांतरित झाल्यास सुविधांमध्ये मोठी भर पडेल, असे गाडीलकर यांनी नमूद केले.
नॅशनल हायवेकडे पाठपुरावा
नॅशनल हायवेने खोपडी व पाथरी येथे साईभक्तांसाठी बांधलेल्या इमारती त्वरित साईबाबा संस्थानकडे हस्तांतरित कराव्यात, अशी मागणी संस्थानतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात नॅशनल हायवे सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.
विखे कुटुंबीयांकडे प्रत्यक्ष भेटीचा मानस
नॅशनल हायवेने बांधलेल्या खोपडी-पाथरी येथील दोन्ही इमारती साईबाबा संस्थानकडे हस्तांतरित व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करण्यात येणार आहे. साईबाबा संस्थानसाठी मंत्री विखे पाटील यांची सदैव सकारात्मक भूमिका राहिलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचाही लवकरच निकाल लागेल, असा विश्वास छोटेबापू उर्फ दत्तात्रय कोते यांनी व्यक्त केला.