नेवासा-आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या येथील माऊलींच्या पैस खांबाचे काल रविवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी भक्तांच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम, या नामघोषाने परिसर दुमदुमला होता.
आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने काल पहाटेच्या सुमारास माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात नाशिकहुन येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेल्या भाविकांच्या हस्ते चमेली चंदन उटीसह पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. एकादशी निमित्त पहाटेपासूनच येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी वै.बन्सी महाराज तांबे वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका बजावून विशेष सेवा दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात शहरातील करविनी निवासिनी ग्रुपच्या महिलांनी एकत्रित येत टाळ वाजवून ज्ञानोबा माऊली तुकारामचा नामघोष करत भक्तीत तल्लीन होऊन रिंगण सादर केले. शुद्ध वारी निमित्ताने पंचक्रोशीतील क्षेत्रामधून ही अनेक दिंड्यांनी नेवासा येथे हजेरी लावली. मंदिर प्रांगणात विविध प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती.
त्यामुळे मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते.
नेवासा शहरातील संत तुकाराम महाराज मंदिर, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर ही देवालये ही भाविकांच्या व गर्दीने फुलून गेली होती. भाविकांच्या गर्दीने नेवासा शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकादशी उत्सवाचे औचित्य साधून नेवासा येथील वकील मंडळींनी देखील ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंत दिंडी काढली होती. या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.