भारतीयांच्या स्वयंपाकघरातून जेव्हा ताज्या वाफाळलेल्या पोळ्यांचा, मसालेदार भाजीचा आणि गरमागरम चहाचा सुगंध दरवळतो, तेव्हा त्या क्षणात काहीतरी खास असतं एक अस्सल, आत्म्याला भिडणारं भारतीयपण. आणि आता, या अस्सल चवीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. नुकताच प्रसिद्ध ‘TasteAtlas’ संस्थेने जाहीर केलेल्या ‘जगातील 100 सर्वोत्तम अन्न शहरे’ या यादीत भारताच्या तब्बल 6 शहरांचा समावेश झाला आहे. ही केवळ एका यादीतली नोंद नाही, तर आपल्या संस्कृतीच्या, आपल्या चवांच्या आणि आपल्या इतिहासाच्या आंतरराष्ट्रीय गौरवाची नोंद आहे.

भारताची खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ मसाल्यांचं मिश्रण नाही, तर ती आपल्या भूमीचा श्वास आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या परंपरा, विविध हवामान, ऐतिहासिक प्रभाव आणि अनोख्या सर्जनशीलतेतून भारतीय अन्न तयार झालं आहे. मुंबईपासून चेन्नईपर्यंत, आपलं प्रत्येक शहर जेवणाच्या माध्यमातून एक वेगळी कथा सांगतं.
भारतातील 6 शहरे
मुंबई, ज्याला आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो, ती आता जागतिक खाद्यसंस्कृतीचीही राजधानी ठरत आहे. जगभरात पाचव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा आत्मा आहे, तिचा रस्त्यांवरचा जीवंतपणा, खिमा पाव, वडापावपासून ते कोळीवाडा कोळंबीपर्यंत. अमृतसरच्या तूपात भिजलेल्या कुलच्यांची गोष्टच वेगळी. तिथलं अन्न म्हणजे पंजाबच्या समृद्ध मातीचा आणि गुरुद्वारांमधील लंगर परंपरेचा संगम. दिल्लीचं अन्न तर जणू राजधानीच्या इतिहासाची चव घेऊन येतं. छोले-भटुरे, पराठेवाली गली, आणि मोहल्ल्यांमधून दरवळणारे कबाब हे सगळं केवळ खाणं नाही, तर एका संस्कृतीचं दर्शन आहे.
हैदराबादमधील बिर्याणी, जी इराणी आणि मुघल प्रभावांनी सजली असली तरी तिथल्या मसाल्यांनी, लोकांच्या चवीनं आणि काळाच्या ओघात ती पूर्णपणे ‘हैदराबादी’ बनली आहे. कोलकात्याचे मुघलाई पराठे, काठी रोल्स, आणि संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून खाल्ले जाणारे झणझणीत चाट पदार्थ, हे ब्रिटिश आणि बंगाली संस्कृतीच्या मिलाफातून जन्माला आलेले आहेत. तर चेन्नईचं जेवण, त्यातील डोसा, सांबार आणि फिल्टर कॉफीहे केवळ पदार्थ नाहीत, तर तमिळ संस्कृतीचा एक शुद्ध, पारंपरिक प्रतिबिंब आहे.
इटलीचं नेपल्स शहर आघाडीवर
या सर्व शहरांची खासियत म्हणजे त्यांनी वेळेच्या ओघात बदल स्वीकारले, पण आपल्या मूळ चवांशी प्रामाणिक राहिले. TasteAtlas च्या यादीत, भारताच्या या 6 शहरांना जागतिक दर्जाची ओळख मिळाली आहे. मुंबई पाचव्या क्रमांकावर, अमृतसर 43 व्या, दिल्ली 45 व्या, हैदराबाद 50 व्या, कोलकाता 71 व्या आणि चेन्नई 75 व्या क्रमांकावर आहेत. यादीच्या शिखरावर आहे इटलीचं नेपल्स, जे त्याच्या क्लासिक पिझ्झासाठी ओळखलं जातं. पण या यादीत भारताची हजेरी म्हणजे केवळ गर्वाची गोष्ट नाही, तर जगाने आपल्या चवांना, आपल्या परंपरेला आणि आपल्या अन्नातल्या आत्म्याला सलाम केल्यासारखं आहे.