निसर्गाचं अद्भुत रूप पाहून थक्क व्हाल! भारतीयांना ‘या’ देशात व्हिसाशिवाय मिळते एंट्री, 90 दिवस करता येईल धम्माल-मस्ती

Published on -

सुट्टीवर जायचंय पण व्हिसाच्या झंझटीने कंटाळा आलाय? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही 90 दिवस कोणत्याही व्हिसाशिवाय एका सुंदर देशात मुक्तपणे भटकंती करू शकता आणि तो देश म्हणजे त्रिनिदाद आणि टोबॅगो. दोन बेटांनी बनलेला, निसर्गाने नटलेला आणि भारतीयांच्या काळजाला भिडणारा एक अनोखा देश.

त्रिनिदाद आणि टोबॅगो

त्रिनिदाद आणि टोबॅगो ही केवळ सुंदर पर्यटनस्थळच नाही, तर येथे भारतीय संस्कृती देखील दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे येथील लोकसंख्येचा एक मोठा भाग भारतीय वंशाचा आहे. इतकेच नाही तर राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक उच्चपदस्थ नेते भारतीय मूळाचे आहेत. त्यामुळे, जर तुम्ही या देशात गेलात, तर तुम्हाला परकेपणाचा अनुभव जाणवणार नाही उलट, ती एक आपुलकीची अनुभूती असेल.

भारतीय पर्यटकांसाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे 90 दिवस व्हिसाशिवाय राहता येतं. प्रवास, पर्यटन, व्यावसायिक भेटी किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी ही परवानगी लागू आहे. मात्र, अभ्यास किंवा नोकरीसाठी मात्र व्हिसा आवश्यक ठरेल. त्यामुळे तिथे जाण्याआधी तुमचा उद्देश स्पष्ट असावा.

महत्वाच्या अटी

या देशात प्रवेश करताना काही सोप्या अटींचं पालन करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वैध पासपोर्ट (जो कमीत कमी 6 महिन्यांसाठी वैध असावा), परतीचं विमान तिकीट, राहण्याची व्यवस्था हॉटेल बुकिंग किंवा यजमानाचं निमंत्रणपत्र यांचं दस्तऐवजीकरण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शिवाय, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेऊ शकता का, याची खात्री इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून घेतली जाऊ शकते.

पर्यटनाची स्थळे

एकदा तिथे पोहोचलात की मग निसर्गाच्या कुशीत रमून जाल. येथे असलेले वर्षावन, धबधबे, समुद्रकिनारे, प्रवाळ खडकांचे पारदर्शक सौंदर्य आणि पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेले आसा राईट नेचर सेंटर हे सगळं तुमच्या सहलीला स्वर्गसुखाचं रूप देईल. इथला ‘त्रिनिदाद कार्निव्हल’ तर जगप्रसिद्ध आहे. एक रंगीबेरंगी उत्सव, ज्याला ‘पृथ्वीवरील सर्वात मोठा शो’ असं म्हटलं जातं.

पण इथलं खरं खासपण आहे ते म्हणजे भारतीयत्वाची झलक. होळी, दिवाळी, ईद, ख्रिसमस हे सण इथे फार थाटात साजरे होतात. येथील मंदिरं, गीता पाठ, भजनांची मैफिल आणि अगदी भारतीय जेवणही तुम्हाला घरासारखं वाटायला लावेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!