अहिल्यानगर- जिल्ह्यात मागील वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाला सोमवारी सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ९१.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने काही प्रमाणात खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी अद्याप समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७७ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून या पावसाने पिकांना संजीवनी मिळणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात जूनमध्ये ८० मिमी, जुलै महिन्यात ११.३ मिमी पावसाची नोंद झाली. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात ५.९ मिमी पाऊस झाला. दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणांत विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ५२ हजार ५२० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण सुमारे ७७.१५ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक १ लाख ४६ हजार ८६९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल १ लाख १५ हजार ५१३ हेक्टरवर कपासीची लागवड झाली आहे. जिल्ह्यात १८ हजार ७४५ हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात भात पिकाची ६ हजार ५० हेक्टरवर लावणी झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ८९ हजार ६२९ हेक्टर आहे. त्या तुलनेत ४७ हजार ३७५ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाखालील ७७ हजार ९९९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतपर्यंत मका पिकाची ७२ हजार १११ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
तूर पिकाखालील सरासरी क्षेत्र ६४ हजार ५८४ हेक्टर आहे. आतापर्यंत तुरीची ५५ हजार ११६ हेक्टरवर पेरणी झाल. मुगाचे सरासरी क्षेत्र ५१ हजार ९८० असून आतापर्यंत मुगाची ४२ हजार ८९४ हेक्टरवर पेरणी झाली. उडिदाचे सरासरी क्षेत्र ६७ हजार ५९५ हेक्टर असून आतापर्यंत ६० हजार ३०८ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली. भुईमुगाची ३१६८ हेक्टरवर, तीळ १५ हेक्टर, कारळे १३ हेक्टर, सूर्यफुल २८ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात उसाचे १ लाख ३३ हजार २९७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत उसाची १२ हजार ८८९ हेक्टरवर लावणी झाली आहे.
पाथर्डीत सर्वात कमी, तर अकोल्यात सर्वाधिक पाऊस
अकोले तालुक्यात जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक १८७.१ मिमी पाऊस झाला आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वात कमी ५०.५ मिमी पाऊस झाला आहे. नगर तालुक्यात ७५.८ मिमी, पारनेर १२१.४ मिमी, श्रीगोंदा ९२.८ मिमी, कर्जत ८०.९ मिमी, जामखेड ६६.१ मिमी, शेवगाव ७०.५ मिमी, नेवासे ६५ मिमी, राहुरी ८४.४ मिमी, संगमनेर १२०.२ मिमी, कोपरगाव ९७ मिमी, श्रीरामपूर ६०.५ मिमी, तर राहाता तालुक्यात ७६.६ मिमी पाऊस झाला.