श्रीगोंदा- जमिनीच्या वादातून घरात घुसून महिलेसह पतीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी आरोपींनी ४५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्याच्या दोन अंगठया व गळयातील गंठण बळजबरीने हिसकाऊन घेतले. ही घटना रविवारी संध्याकाळी चिखली येथे घडली.
या घटनेत महिलेचा पती आणि हॉटेलवरील कामगार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गोरख सुभाष झेंडे, तुषार जालिंदर झेंडे, सुरेखा मच्छिद्र झेंडे, तुकाराम विष्णू झेंडे, स्वप्नील गोरख झेंडे, शुभम मच्छिद्र झेंडे, मच्छिद्र सुभाष झेंडे सर्व (रा. चिखली, ता.श्रीगोदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे पती रविवारी दुपारी शेतात जात असताना आरोपींनी फिर्यादीच्या पतीला तू इकडे का आलास ? असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या वेळी गोरख सुभाष झेंडे याने डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून फिर्यादीचे पती गणेश यांना घरच्यांना मारून टाकू अशी धमकी दिली.
त्यांनतर आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीचा मुलगा यशराज यास पकडून जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करून फिर्यादीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच फिर्यादीचा कामगार कृष्णा सिंग याच्या डोक्यात लाकडी दांडके मारल्याने तो जखमी झाला. आरोपी यांनी फिर्यादीच्या घरात बळजबरी घुसून रोख रक्कम ४५ हजार रुपये, सोन्याच्या दोन अंगठया व गळ्यातील गंठण बळजबरीने घेऊन गेले. पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.
संध्याकाळी पाच वाजता गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांनी बसवून ठेवत गुन्हा दाखल करण्यास पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, महिलेने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा देताच पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतल्याची माहिती पीडित महिलेने दिली.