संगनेरमध्ये घरकुल बांधकामासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं, पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

संगमनेर- घरकुलासाठी लागणाऱ्या वाळूच्या परवानगीसाठी तालुक्यातील कनोली येथील तलाठ्यास २५ हजार रुपयांची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने येथील बस स्थानक परिसरात रंगेहात पकडले. संगमनेर बस स्थानक परिसरात काल सोमवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यात घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे गावातील नागरिक घरकुलाच्या कागदपत्रांची पूर्तता तयार करून घरकुल मिळवत आहे. शासनाची परवानगी मिळाली की, घर बांधण्यासाठी जागा तयार करत आहे. मात्र, घरकुलांच्या कामासाठी वाळू मिळत नसल्याने घरकुल धारकांना महसुल विभागातील तलाठ्याचे उंबरे झिजवावे लागत आहे.

कनोली येथील घरकुल धारकांना वाळू मिळवण्यासाठी तलाठी संतोष शेलार यांच्याकडे तक्रारदार परवानगीसाठी जात होता. मात्र, वेगवेगळे कारणे सांगून तलाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी देत नव्हता. शासनाने घरकुलांना वाळू उचलण्यासाठी कायद्याच्या अटी व शर्ती घालुन परवानगी दिली असतानाही हा तलाठी अडवणूक करत होता.

तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात तसेच ओढ्यातुन, पाझर तलाव या ठिकाणांवरून तहसीलदार यांनी घरकुलाच्या कामासाठी वाळू उचलण्यासाठी परवानगी दिली आहे. गावा-गावातील पॉईंट काढुन घरकुल लाभधारकांना सोईस्कर होईल. तेथून वाळू उचलण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, कनोली गावातील तलाठी संतोष शेलार हा पैसे मागण्याच्या उद्देशाने अडवणूक करत होता. तक्रादार यांनी तलाठी संतोष शेलार यांना विचारले असता, त्याने २५ हजार रुपयांची मागणी केली.

तेव्हा तलाठ्यांच्या वारंवार मागणीला वैतागल्याने तक्रारदाराने थेट अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अहिल्यानगरचे पथक थेट संगमनेरात दाखल झाले. तक्रारदार हे त्यांच्या मतावर ठाम होते. लाचखोर तलाठी संतोष शेलार यांनी तक्रारदाराला बसस्टँड परिसरात बोलवले. या ठिकाणी लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यावेळी तलाठी संतोष शेलार यांना २५ हजरांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!