भंडारदरा- अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील रंधा धबधब्यावर रविवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात तरुणाने जोरदार वाहणाऱ्या प्रवाहात उडी घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अत्यंत धोकादायक आणि जीवावर बेतू शकणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजुर पोलीस स्टेशनकडून पर्यटकांना अशा प्रकारच्या कृती टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रंधा धबधब्यावर प्रचंड जलप्रवाह निर्माण झाला आहे. या प्रवाहात उडी मारून संबंधित तरुणाने धोकादायक स्टंट केल्याचे समोर आले असून, तो पोहत जाऊन एका बाजूला सुरक्षित पोहोचला. तरीही त्याच्या या कृतीमुळे जीव गमावण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सध्या भंडारदरा पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ना पोलीस विभागाकडून, ना धरण प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. राजुर पोलीस स्टेशनकडे असलेले संख्याबळ अपुरे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या बेजबाबदार वर्तनावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत आहेत.
पूर्वी कृष्ण प्रकाश पोलीस अधीक्षक होते, त्यावेळी त्यांनी भंडारदऱ्याच्या पर्यटक नियंत्रणासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळाले होते. सध्या परिस्थिती पाहता, अशाच पद्धतीचे पथक पुन्हा भंडारदऱ्यावर नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.