करंजी : राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा एकच्या दुरुस्ती कामासाठी जलसंपदा विभागाकडून १४ कोटी ६० लक्ष ६२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, वांबोरी चारी टप्पा एकमधील अनेक पाझर तलावांमध्ये पाणी पोहोचत नाही. या सर्व तांत्रिक अडचणी दूर करून प्रत्येक लाभधारक तलावात पाणी पूर्णदाबाने पोहोचावे व लाधारक शेतकऱ्यांना या टप्पा एकच्या योजनेचा निश्चितपणे लाभ व्हावा, यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली होती.

यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील प्रयत्न केले. त्यामुळे या योजनेच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ६० लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. या निधीच्या माध्यमातून मुळा धरणावरील पंपहाऊस दुरुस्ती, मुख्य पाईपलाईनच्या वितरण व्यवस्थेची कामे, तसेच एअरवॉल्व्ह चेंबर नवीन बसवणे अथवा दुरुस्ती करणे, यांत्रिकी व विद्युत कामांची दुरुस्ती करणे, आदी कामे केली जाणार आहेत.x
वांबोरी चारी टप्पा एकच्या पाण्यापासून अनेक गावे व तलाव वंचित आहेत. अशा लाभधारक शेतकऱ्यांना आता हक्काचे पाणी मिळणार आहे. ना. विखे पाटील यांनी या निधीला मंजुरी दिल्याने लवकरच वांबोरी चारी टप्पा एकच्या दुरुस्तीला सुरुवात होईल. या योजनेच्या शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आ. कर्डिले म्हणाले.
वांबोरी चारी टप्पा एकमध्ये राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ४३ गावांचा समावेश असून, १०२ लाभधारक पाझर तलाव आहेत. मुळा धरणातून ६८० एमसीप्टी पाणी यासाठी राखीव असून, या पाण्यामुळे ३५६८ हेक्टर क्षेत्र या योजनेच्या पाण्यामुळे सिंचनाखाली येणार आहे, त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाते.