राहुरी- प्रेमात अडथळा होत असलेल्या पतीला पत्नी व तीच्या प्रियकराने शिवीगाळ करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना दि. २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात घडली.
या घटनेतील पती-पत्नी राहुरी तालुक्यातील मांजरी परिसरात राहतात. पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याबाबत पतीला संशय आहे. दि. २ जुलै २०२५ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पती-पत्नी घरात असताना आरोपी खिडकीतून घरात डोकावून पाहत होता.

त्याला पाहून पती-पत्नी घराच्या बाहेर आले. तेव्हा आरोपी पळून गेला. तेव्हा पतीने याबाबत पत्नीला विचारणा केली असता पत्नीने ‘तू आता माझ्या आईकडे चल’ असे म्हणत दोघे पती पत्नी आईकडे जात होते. रस्त्यातच पत्नी व तीचा प्रियकर तसेच इतर दोन अनोळखी इसमांनी पतीला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच तू आमच्यामध्ये आला तर तुला मारून टाकू, अशी धमकी पत्नीच्या प्रियकराने पतीला दिली. पतीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी तसेच प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.