कोणतंही कर्ज न घेता खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा 5/20/30/40 फॉर्म्युला!

घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात असते, अगदी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या तर प्राथमिक स्वप्नांपैकी एक. पण हे स्वप्न प्रत्यक्षात आणताना येणाऱ्या अडचणी, पैशांची चिंता, कर्जाचा ताण आणि दीर्घकाळ चालणाऱ्या ईएमआयचा बोजा हे सर्वजण अनुभवतात. आज आपण अशाच एका सोप्या पण प्रभावी फॉर्म्युल्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे हे स्वप्न थोड्याच बजेटमध्ये वास्तव बनू शकतं. याला म्हणतात 5/20/30/40 फॉर्म्युला. नावात जरी गणित वाटत असले, तरी या संकल्पनेमागे खूप सुलभ आणि समजण्यासारखी अर्थव्यवस्था दडलेली आहे.

‘5’ म्हणजे?

या फॉर्म्युल्याचे पहिले सूत्र म्हणजे ‘5’ म्हणजेच तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 5 पट किंमतीचे घरच खरेदी करा. उदाहरण द्यायचं झालं तर, जर तुमचं उत्पन्न दरवर्षी 10 लाख रुपये असेल, तर तुम्ही 50 लाखांपर्यंतचं घरच शोधा. यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून निर्णय घेता, आणि भविष्यात आर्थिक ओढाताण टाळू शकता.

‘20’ म्हणजे?

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘20’, म्हणजे गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षांपेक्षा जास्त नसावा. काही वेळा कमी कालावधीसाठी कर्ज घेतल्यास ईएमआय मोठा येतो, पण एकूण व्याज कमी लागतो. त्यामुळे हा कालावधी आपल्या उत्पन्न आणि बचतीच्या पद्धतीनुसार ठरवावा. 20 वर्षांचा कालावधी ही एक सुरक्षित मर्यादा मानली जाते.

‘30’ चा अर्थ

यानंतर ‘30’ या अंकाचा अर्थ सांगतो की, घरासाठी घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता म्हणजे ईएमआय तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त असू नये. उरलेले पैसे दैनंदिन गरजा, बचत आणि आकस्मिक खर्चासाठी राखून ठेवणे फार महत्त्वाचं आहे. जर तुमचं उत्पन्न दरमहा 80,000 रुपये असेल, तर 24,000 रुपयांपेक्षा जास्त ईएमआय टाळावा.

‘40’ चा नियम

शेवटी ‘40’ चा नियम सांगतो की, घराच्या एकूण किमतीच्या किमान 40% रक्कम डाउन पेमेंट म्हणून द्या. हे केल्यामुळे कर्जाची रक्कम कमी राहते आणि त्यावर लागणारे व्याजही कमी होते. उदाहरणार्थ, 50 लाख रुपयांच्या घरासाठी 20 लाख रुपये डाउन पेमेंट करून फक्त 30 लाखांचे कर्ज घ्या, त्यामुळे कर्जाची परतफेड सुलभ होईल आणि मानसिक शांतताही लाभेल.

घर खरेदी करताना सर्वसामान्य माणूस अनेक आशा, योजना आणि थोडी भीतीही बाळगून असतो. हे स्वप्न केवळ भावनिक नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचं असतं. 5/20/30/40 नियम हे स्वप्न अधिक स्थिर, सुरक्षित आणि यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवतं. कर्ज घेताना घाई करू नका, नीट विचार करा आणि या स्मार्ट फॉर्म्युल्यानुसार पावलं टाका.