ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिर श्रद्धेचा, भक्तीचा आणि अद्भुत रहस्यांचा संगम आहे. एक असं ठिकाण, जिथे देव म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, तर ते एक ‘जिवंत अस्तित्व’ मानलं जातं. हजारो वर्षांची परंपरा, कोट्यवधी लोकांची श्रद्धा आणि त्यामागे असलेली गूढता हे सगळं एवढं प्रभावी होतं की इंग्रजसारख्यांनीसुद्धा याकडे डोळे विस्फारून पाहिलं. त्यावेळी धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीचा विचार न करणारे हे ब्रिटीश अधिकारी, अखेर या मंदिराच्या प्रभावाने हादरले होते.

ब्रिटीश राजवटीत, भारतात सगळं नियंत्रित करावं, समजून घ्यावं, या उद्देशाने इंग्रजांनी अनेक ठिकाणी हेरगिरी केली. पण जेव्हा जगन्नाथ मंदिरासारख्या अतीशय पवित्र जागेवर त्यांची नजर गेली, तेव्हा त्यांनी तिथेही गुप्तपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या एजंटांना यात्रेकरू किंवा साधूंच्या वेशात तिथे पाठवायला सुरुवात केली. मात्र, तेथील रहिवाश्यांना हे कळताच संतापाने वातावरण पेटलं.
ब्रिटिशांनी काय म्हटलं होतं?
ब्रिटीश लेफ्टनंट स्टर्लिंग याने त्याच्या वैयक्तिक डायरीत लिहिलेलं आहे की, “मंदिरात प्रवेश करताच, मला जाणवलं की त्या मूर्ती श्वास घेत आहेत… त्या मला पाहत होत्या!” हे केवळ शब्द नव्हते, तर एक अनुभव होता, जो बुद्धीला गोंधळवून टाकणारा आणि मनाला स्तब्ध करणारा होता. त्याच्या मते, हे कोणतं यंत्र नव्हतं, कोणताही भास नव्हता, तर जिवंत देवतेचा प्रत्यय होता.
हे ऐकूनही पुरेसं वाटत नाही, पण जेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्याने गर्भगृहात प्रवेश केला, तेव्हा तो इतका तापाने फणफणला की त्याला तातडीनं बाहेर काढावं लागलं. दुसरा अधिकारी तर अर्धा वेडा होऊन किंचाळत बाहेर पळाला. जे काही त्यांना तिथे दिसलं, जाणवलं, ते शब्दांत मांडता आलं नाही. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं “He is a Living God!”
मंदिरात श्रीकृष्णाचं हृदय?
हळूहळू इंग्रजांनी मंदिराच्या गर्भगृहात जाणं टाळायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने ते एक “डेंजर झोन” बनलं. कारण एका पिढीनंतर दुसरी पिढी या मंदिराला ‘दैवी संरक्षणाखालील जागा’ म्हणून ओळखू लागली. देवतेसारख्या भावना फक्त भारतीयांमध्ये नाही, तर त्या गोर्या साहेबांच्या मनातही रुजल्या होत्या.
पण या सर्वांत सर्वात थरारक गोष्ट म्हणजे, आजही लोकांचं म्हणणं आहे की भगवान जगन्नाथांच्या मूर्तीत श्रीकृष्णाचं हृदय आहे… आणि ते अजूनही धडधडतं. यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं म्हणणं आहे की, जेव्हा श्रीकृष्णाचं शरीर जळालं, तेव्हा त्यांचं हृदय न जळता टिकून राहिलं आणि तेच जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये एक पवित्र गुप्त विधीनंतर स्थापित करण्यात आलं. हे हृदय ‘ब्राह्म’ म्हणून ओळखलं जातं आणि त्याचा स्पर्श कोणी सहज करू शकत नाही. किंबहुना, ज्यांनी हा प्रयत्न केला, त्यांच्या बाबतीत काहीतरी अनिष्ट घडलं, असं सांगितलं जातं.