भारतीयांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने आपल्या गोल्डन व्हिसा धोरणात मोठे बदल करून, अनेक भारतीयांना आयुष्यभरासाठी दुबईसारख्या आधुनिक शहरात स्थायिक होण्याची संधी उघडून दिली आहे. एकेकाळी ज्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक आवश्यक होती, ती संधी आता फक्त काही लाख रुपयांत मिळू शकते, हेच तर या बदलाचे खास वैशिष्ट्य आहे.
गोल्डन व्हिसा म्हणजे?

गोल्डन व्हिसा ही संकल्पना तशी काही नवीन नाही, पण आतापर्यंत ती केवळ धनाढ्य व्यावसायिक, मोठे उद्योजक, शास्त्रज्ञ किंवा विशेष कौशल्य असणाऱ्या लोकांपुरती मर्यादित होती. पूर्वी या व्हिसासाठी कमीतकमी 4.66 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक होती, जी सामान्य भारतीयांसाठी जवळपास अशक्यच होती.
त्यामुळे अनेकांना या स्वप्नवत संधीपासून दूर राहावं लागलं. पण आता यूएईने या अटी शिथिल करून, केवळ 1 लाख दिरहम म्हणजेच सुमारे 23.30 लाख रुपयांत आयुष्यभरासाठीचा गोल्डन व्हिसा खुला केला आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आता ही सुवर्णसंधी केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठीच नव्हे, तर शिक्षक, परिचारिका, युट्यूबर, डिजिटल कंटेंट क्रिएटर, आणि इतर व्यावसायिकांसाठीही खुली आहे. म्हणजेच, तुमच्याकडे जर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ठोस कामगिरी, सकारात्मक सामाजिक प्रभाव किंवा विशिष्ट व्यावसायिक कौशल्य असेल, तर तुम्हीही आता यूएईमध्ये तुमचं आयुष्य नव्यानं सुरू करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया
या व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी करण्यात आली आहे. आता भारतातूनच ऑनलाइन पोर्टल, वास्को सेंटर किंवा अधिकृत रायड ग्रुपच्या कार्यालयांद्वारे अर्ज करता येतो. यूएईमध्ये प्रत्यक्ष जाऊन धावपळ करण्याची गरज उरलेली नाही. अर्जानंतर, तुमचा सोशल मीडिया वागणूक, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि व्यावसायिक योग्यता तपासली जाते. कारण यूएई सरकारला खात्री करून घ्यायची असते की अर्जदार त्यांच्या देशासाठी एक सकारात्मक आणि उत्पादक नागरिक सिद्ध होऊ शकतो.
या निर्णयामुळे यूएईमध्ये आता आयुष्यभरासाठी काम, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करण्याची मुभा मिळते. इतकंच नव्हे, तर तुम्ही तुमचं कुटुंब आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रायोजित करू शकता. यामुळे वारंवार व्हिसा नूतनीकरण करण्याची झंझट नाही, आणि तुम्हाला स्थायिकतेचा एक नवा अनुभव मिळतो.
ही योजना सुरुवातीला फक्त भारत आणि बांगलादेशसाठीच खुली करण्यात आली आहे आणि पहिल्या टप्प्यात केवळ 5,000 भारतीय अर्जदारांना संधी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ज्यांना खरंच परदेशात एक स्थिर आणि संधींनी भरलेलं आयुष्य हवं आहे, त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय महत्त्वाची आहे.