आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, धडकेत एका तरूणाचा जागीच मृत्यू, सुपा पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

पारनेर- अहिल्यानगर -पुणे महामार्गावरून, पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या एमजी ग्लोस्टर या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पळवे खुर्द येथील नितीन शेळके (वय ३४) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने नगरकडे निघालेल्या भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने दुचाकीवरून पळव्याकडे निघालेल्या नितीन शेळके यांना चिरडून तो नितीन यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने त्याच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार : नितीन प्रकाश शेळके हे जातेगाव फाटा येथे हॉटेल सह्याद्री चालवत होते. सोमवारी रात्री ते व्हॉटेलवरून आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जातेगाव फाटा येथील रस्ता नगरकडे जाणारा रस्ता ओलांडताना त्यांची दुचाकी (क्र. एम. एच. १६ डी. जे. ३७६५ ला भरधाव वेगाने नगरकडे जाणाऱ्या (एम. जी. ग्लोस्टर क्र. एम. एच. २३-२९२९) या कारचा चालक सागर सुरेश धस याने जोराची धडक दिली. त्यात नितीन हे चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हा अपघात झाला त्यावेळी नितीन यांचा चुलत भाऊ स्वप्निल पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ नितीन यांची वाट पाहत होते. अपघात झाल्याचे पाहून ते घटनास्थळी पोहचले असता, नितीन यांच्या दुचाकीस कारने धडक देऊन ते गंभीर जखमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ जखमी नितीन यांना रस्त्याच्या बाजूला घेतले व चुलत भाऊ अमोल शेळके, सतीश शेळके, नीलेश शेळके यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी सर्वजण आल्यानंतर त्यांनी जखमी नितीन यांना सुपा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

अपघाताबाबत माहिती देण्यासाठी स्वप्निल व त्यांचे भाऊ सुपा पोलीस ठाण्यात पोहचले असता, नितीन व स्वप्निल यांचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे व अपघातातील आरोपी सागर सुरेश धस यांनी झालेल्या अपघाताची खबर सुपा पोलिसांना दिली होती. त्यानंतर सुपा पोलिसांकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला. पुढे नितीन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नितीन यांच्यावर शोकाकुल वातावरणात पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोघे चिमुरडे पोरके

नितीन यांना दोन वर्षे व आठ महिन्यांची, अशी दोन मुले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने दोघे चिमुरडे आपल्या वडिलांना तर त्यांची पत्नी पतीला पोरके झाले आहेत. त्यांच्या पत्नीसह परिवाराला या अपघाताने दुःखाच्या खाईत लोटले आहे.

शेळके कुटुंबातील दोन सदस्य यापूर्वी जातेगाव फाटा परिसरात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. आता नितीन यांचाही अपघात त्याच परिसरात होऊन त्यांनाही आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!