श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम. वसुंधरा मधुकर जगताप यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मंगळवारी दि.८ जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काढला.
पी.एम.श्री योजना तसेच शालेय पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून तसेच भ्रष्टाचाराची पोलखोल केली म्हणून तक्रारदार पालकांच्या मुलीना अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिल्याच्या कारणामुळे कारवाई करण्यात आली.

श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेतील पोषण आहारात भ्रष्टाचार असल्याची तक्रार टिळक भोस, अरविंद कापसे यांच्यासह पालकांनी जिल्हा परिषदेकडे करत भ्रष्टाचाराची पोलखोल करत पोषण आहारातील सुमारे सव्वादोन टन तांदूळ गायब असल्याचे समोर आणले.
तसेच पीएमश्री योजने अंतर्गत आलेले अनुदान बेकायदा पद्धतीने वापरत त्याची रक्कम शिक्षकांच्या नावावर तसेच जवळच्या नातेवाईकांच्या नावावर काढत भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने शाळेतील कागदपत्रांची तपासणी होऊन तसा अहवाल जिल्हा परिषदेला दिला गेला होता. या अहवालात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील अनियमितता, आर्थिक अभिलेखे अद्यावत नसणे,
आर्थिक अनियमीतता असल्याचा ठपका ठेवत पदाचा गैरवापर करत कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ चे भाग २ मधील नियम ३ (२) अन्वये जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केल्याचा आदेश केला. या कालावधीत त्यांचे मुख्यालय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती राहुरी दिले आहे.