Ahilyanagar News : जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लिहिले पत्र

निळवंडे धरणाच्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने  सोडावे - माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

Updated on -

Ahilyanagar News : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू झाल्याने निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे. परिणामी या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदीमार्गे होत आहे. मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते तथा मा.जलसंपदा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी मिळावे या मागणीचे पत्र मा. महसूल तथा पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना लिहिले आहे.

पत्राद्वारे मागणी करताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे.त्यामुळे नदी मार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मात्र, दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येते, त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही.

लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे. हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडणे अत्यावश्यक आहे.

 

या दुष्काळी पट्ट्यात आत्ताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल, जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर  त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ डाव्या आणि उजव्या दोनही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मागील दोन वर्षापासून कालव्यांमधून पाणी सोडावे अशी मागणी माजी मंत्री थोरात यांनी केली होती त्यानंतर प्रशासनाने दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला होता.

दुष्काळी भागातील 182 गावांसाठी या धरणाची निर्मिती बाळासाहेब थोरात यांनी केली असून शेतकऱ्यांच्या अडचणी प्रसंगी ते वेळोवेळी मदतीला धावले आहेत.या मागणीमुळे निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी धरण व कालव्यांचे निर्माते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!