श्रीरामपुरमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स प्रकरणावरून आमदार हेमंत ओगले अधिवेशात आक्रमक, सखोल चौकशीची केली मागणी

Updated on -

श्रीरामपूर- राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीवर बोलताना आमदार हेमंत ओगले यांनी आक्रमक भूमिका घेत मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांना काल मंगळवारी वाचा फोडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सापडलेल्या १४ कोटींच्या ड्रग्स बाबत सखोल चौकशीची मागणी केली.

श्रीरामपूर सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स बरोबर नशेचे इंजेक्शन वाईटनर यांसारख्या अमली पदार्थांची सर्रास विक्री चालू असून मोठ्या प्रमाणावर गांजा देखील तस्करी मतदारसंघात होताना दिसून येत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनसाठी मी पहिल्या दिवसांपासून मागणी केलेली आहे. त्या मागणीकडे देखील सकारात्मक भूमिका घ्यावी. संपूर्ण मतदारसंघात महावितरणचे तीन तेरा वाजले असून श्रीरामपूर येथील २०० के.व्ही.चे मंजूर असलेल्या सबस्टेशनचे काम तातडीने चालू करावे, त्यामुळे मतदारसंघातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनेक शेतकरी बांधवांनी सोलर कृषी पंपाची मागणी करून देखील शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप मिळत नाहीत.

बोगस बियाणांचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्यामुळे बळीराजा अडचणीत येताना दिसत आहे. याबाबत सरकार कठोर पावले चालणार आहे का?, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केवळ घोषणाच ठरली असून कृषी विभागाने पीक विम्याचा करोडो रुपयांचा हप्ता देखील आजतागायत भरला नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पिकविमाचा हप्ता भरावा, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केली आहे.

दरम्यान, पिकविम्याची थकीत रक्कम त्वरित भरण्याबाबत आ. हेमंत ओगले यांनी सभागृहात आवाज उठवताच राज्य सरकार जागे झाले आहे. पिकविम्याची थकीत रक्कम त्वरित भरण्याबाबत आ. हेमंत ओगले यांनी सभागृहात आवाज उठवताच राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करत सुमारे ३७५ कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!