भारतीय राजघराण्यांच्या इतिहासात अनेक कथा विलक्षण आहेत, पण बडोद्याच्या महाराणी सीता देवी यांची कहाणी त्यातही अनोखी आहे, ही केवळ एका स्त्रीची शाही झळाळीची कहाणी नाही, तर तिच्या प्रेमासाठी केलेल्या असीम त्यागाची आणि जगाच्या नियमांना धुडकावून दिलेल्या निर्धाराची आहे. एका मुलीपासून महाराणी होण्यापर्यंतचा तिचा प्रवास म्हणजे प्रेम, बंडखोरी, मोह आणि वेदनेने भरलेली एक सुंदर पण वेदनादायी गाथा.

महाराणी सीता देवी यांची लव्ह स्टोरी
सीता देवी या पितामपुराच्या राजघराण्यात जन्मलेल्या आणि आपल्या सौंदर्याने तसेच बुद्धिमत्तेने अनेकांचे मन जिंकणाऱ्या राजकन्या होत्या. त्यांचे पहिले लग्न वायारू अप्पाराव बहादूर या जमीनदाराशी झाले होते. त्या लग्नातून त्यांना तीन मुलेही झाली. पण नियतीने त्यांच्या आयुष्यात एक वेगळे वळण ठेवले होते. 1943 मध्ये, मद्रासमधील एका घोड्यांच्या शर्यतीत त्यांची भेट प्रताप सिंह गायकवाड यांच्याशी झाली, जे त्या काळात जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जात होते. ही भेट क्षणभंगुर नव्हती. या क्षणातून एक अनोखा प्रेमसंबंध जन्माला आला.
सीता देवींनी समाजाच्या चौकटीत बसण्याऐवजी स्वतःच्या मनाचे ऐकले. त्यांनी आपले पहिले लग्न संपवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला, आणि पुढे इस्लाम धर्म स्वीकारून प्रताप सिंह गायकवाड यांच्याशी लग्न केले. त्या बडोद्याच्या दुसऱ्या महाराणी बनल्या. या विवाहातून त्यांना सयाजीराव नावाचा एक मुलगा झाला.
सीता देवी यांची लाईफस्टाइल
त्यांचे वैभव केवळ त्यांच्या लग्नात नव्हते. त्या जगभर प्रवास करत असत, आणि असे सांगितले जाते की त्या नेहमी 1,000 साड्यांसह प्रवास करत. रत्नजडित दागिन्यांमध्ये त्यांची विशेष रुची होती. सात-स्ट्रँड मोत्यांचा हार, 30-कॅरेट नीलमणी, फ्रेंच ज्वेलरी ब्रँड्सकडून खास ऑर्डर केलेले ब्रेसलेट्स आणि इतर लक्झरी वस्तूंनी त्यांचा दैनंदिन सौंदर्याचा दर्जा उंचावला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी सोन्याचा “जीभ क्लीनर” आणि माणिकांनी जडवलेला सिगारेट होल्डर देखील बनवून घेतला होता, ही त्यांच्या विलासी जीवनशैलीची साक्ष होती.
पण या भव्यतेमागे एक हळवं आणि वेदनांनी भरलेलं आयुष्यही लपलेलं होतं. 1956 मध्ये महाराजांनी त्यांना घटस्फोट दिला. दोघांचा एकुलता एक मुलगा एका अपघातात निधन पावला, ज्याने सीता देवींच्या मनाला खोल दुःख दिलं. चार वर्षांनी, 1989 मध्ये, त्यांचाही मृत्यू झाला.