अहिल्यानगर- केडगाव उपनगरातील एक खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन शिक्षकाने केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून विनयंभग, पोस्को बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
विकास भरत कोटकर (रा. शाहुनगर रोड, केडगाव, अहिल्यानगर) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, विकास कोटकर याचे केडगाव येथे खासगी क्लासेस आहे. एक वर्षापासून पीडित मुलगी कोचिंग क्लासला जात होती. क्लासमधील शिक्षकाने पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त क्लासमधील मुला-मुलींना घेऊन पार्टी ठेवली होती.

पीडित मुलगी त्या पार्टीला गेली असता त्या शिक्षकाने पार्टी दिल्यानंतर पीडित मुलीस बाजूला घेऊन, तू मला खूप आवडतेस. तू माझ्या पहिली गर्लफ्रेंड सारखी दिसतेस. मी तुझी काही हॅरेशमेंट करणार नाही. मी टपोरी नाही, असे सांगितले. त्यावेळी हा प्रकार मुलीने घाबरून घरी सांगितला नाही.
त्यानंतर ७ जुलै रोजी सायंकाळी क्लास सुटल्यानंतर पीडित मुलगी घरी जाण्यासाठी बॅग भरीत असताना त्या शिक्षकाने तिला आवाज देऊन बोलावले व त्याच्याकडे ओढून तिला मिठी मारली. त्याच वेळेस पीडित मुलीची आई मुलीस घरी नेण्याकरिता तिथे आली असता तिने त्यांच्या तावडीतून मुलीस सोडवले.
हा प्रकार मुलीच्या वडिलांना फोनवरुन कळविला. मुलीचे वडील पुण्याहून घरी आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता धाव घेतली. पीडितेच्या फिर्यादीवरून त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे करीत आहेत..