अहिल्यानगर महापालिकेत लवकर होणार पदभरती, जाणून घ्या किती आहेत जागा अन् भरली जाणारी पदे?

Published on -

अहिल्यानगर- महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अखेर पावले उचलली जात आहेत. महापालिकेने तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या ४५ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या शासनमान्य संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, करारनामाही पूर्ण झाला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती प्रक्रिया कामकाजातील तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या भरतीअंतर्गत कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक, लिपिक टंकलेखक, संगणक प्रोग्रॅमर आणि पशुधन पर्यवेक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कर्मचारी आकृतिबंधात २,७८० पदे मंजूर असली, तरी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकारी निवृत्त झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात आणि नागरी सुविधांच्या पुरवठ्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः अभियांत्रिकी आणि विद्युत विभागातील रिक्त पदांमुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी पावले उचलली आहेत.

महानगरपालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत १७६ पदे भरण्यास परवानगी दिली होती. मात्र, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात दरमहा सुमारे दोन कोटी रुपयांची वाढ झाली. यामुळे आर्थिक ताण वाढल्याने सर्व १७६ पदे भरण्याऐवजी तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ ४५ अत्यावश्यक तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिकेने भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थेला जबाबदारी सोपवली आहे. या भरतीसाठी बिंदुनामावली आणि समांतर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. टीसीएससोबत करारनामा पूर्ण झाला असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, ही भरती प्रक्रिया तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी आणि महापालिकेचे कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टीसीएसद्वारे राबवली जाणारी ही प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार आणि पारदर्शकपणे होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भरली जाणारी पदे आणि जागा

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४५ तांत्रिक आणि प्रशासकीय पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): १५ जागा, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), ३ जागा कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल): १ जागा, अभियांत्रिकी सहाय्यक: ८ जागा, विद्युत पर्यवेक्षक: ३ जागा, लिपिक टंकलेखक: १३ जागा, संगणक प्रोग्रॅमर: १ जागा, पशुधन पर्यवेक्षक: १ जागा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!