राजस्थान हे केवळ वाळवंटाचे राज्य नाही, तर राजेशाही परंपरा, भव्य किल्ले, राजवाडे आणि रंगीबेरंगी संस्कृतीने भरलेली एक अमुल्य वारसा स्थळ आहे. इथल्या अनेक वाड्यांनी आणि हवेल्यांनी इतिहासाचे अनेक सोनेरी क्षण पाहिले आहेत. कधीकाळी जे राजे-महाराजांचे निवासस्थान होते, तेच आज आलिशान हॉटेल्समध्ये रूपांतरित झाले आहेत. इथे राहणे म्हणजे इतिहासाच्या गर्भात जाऊन वर्तमानाचा विलक्षण अनुभव घेणे. जर तुम्हाला शाही थाटामाटाचा अनुभव घ्यायचा असेल, तर राजस्थानातील हे राजवाडे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

‘रणवास’ बुटीक हॉटेल
सर्वप्रथम नागौर जिल्ह्यातील ‘रणवास’ बुटीक हॉटेल. हे हॉटेल पूर्वी नागौरच्या राण्यांचा निवासी भाग होता. एकेकाळी स्त्रिया जिथे दरबार भरवायच्या, गोडगोड गाणी गायची आणि आपली संस्कृती जपत जीवन जगायच्या, तीच जागा आज तुम्हाला आलिशान खोल्यांमधून इतिहासाची अनुभूती देते. येथे वास्तव्य करताना तुम्हाला शतकानुशतके जुना काळ अनुभवता येतो, जिथे प्रत्येक भिंत काहीतरी सांगते आणि प्रत्येक कोपरा इतिहासाचे साक्षीदार असल्यासारखा वाटतो.
‘अलसीसर हवेली’
जयपूरमध्ये तुम्हाला अनेक शाही हवेल्या आणि भव्य वास्तू दिसतील, पण ‘अलसीसर हवेली’ त्यातही खास आहे. ही हवेली केवळ जुन्या राजेशाही वास्तुकलेसाठी प्रसिद्ध नाही, तर येथे इंडो-इस्लामिक आर्किटेक्चर आणि आधुनिक सोयीसुविधांचा अफलातून मिलाफ आहे. येथे तुम्हाला भव्य दरवाजे, रंगीबेरंगी भिंती, सजवलेली अंगणं, तसेच आजच्या काळाच्या सर्व सोयी-सुविधा मिळतात, जसे की स्विमिंग पूल, आरामदायी खोल्या आणि राजेशाही जेवणाचा अनुभव.
‘द जोहरी’’ हवेली
जयपूरमधले आणखी एक अनोखे ठिकाण म्हणजे ‘द जोहरी’. ही हवेली जुन्या काळातील असूनही आतून आधुनिक आणि ट्रेंडी सजावट करून सजवली गेली आहे. येथे तुमचं स्वागत विंटेज फर्निचर, कलात्मक आरसे, पारंपरिक झुंबर, आणि आरामदायी बेड्स करतात. या हॉटेलचा प्रत्येक भाग एक गोष्ट सांगतो कधी तुम्हाला महाराणीच्या खाजगी दालनात घेऊन जातो, तर कधी दरबाराच्या झगमगाटात. येथे वास्तव्य म्हणजे एकाच वेळी भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील एक सुंदर प्रवास.
‘RAAS’ हॉटेल
जोधपूरमध्ये, मेहरानगड किल्ल्याच्या छायेत वसलेले ‘RAAS’ हॉटेल हे आधुनिकतेचा आणि परंपरेचा उत्तम संगम आहे. लाल दगडात बांधलेली ही वास्तू, जुन्या हवेलीचा आदर राखून तयार केलेली आहे. येथे तुम्ही आधुनिक बुटीक अनुभव घेऊ शकता, पण त्याचवेळी दरवाज्याच्या बाहेर नजर टाकल्यावर तुम्हाला दिसेल तो ऐतिहासिक किल्ला, जणू तुमच्या राहण्यावर नजर ठेवतोय. इथे दिवसा भव्य अंगणात झोपाळ्यावर वेळ घालवता येतो आणि रात्री त्या जुन्या भिंतींच्या सावलीत बैठकीचा अनुभव घेत, इतिहासाशी संवाद साधता येतो.
या सर्व हॉटेल्समध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, ‘अनुभव’. केवळ एक खोलीत राहणे नाही, तर एका इतिहासात श्वास घेणे. येथे लग्न समारंभ देखील अनेकदा राजेशाही शैलीत साजरे होतात. जर तुम्हाला तुमचा विशेष दिवस लक्षात राहील असा साजरा करायचा असेल, तर हे वाडे आणि हवेल्या एक परीकथेतील विवाहासाठी परिपूर्ण ठिकाण ठरू शकतात.