जामखेड- जामखेड आणि कर्जत तालुक्यातील चार प्रमुख देवस्थानांवर यंदा आषाढी रथयात्रेनिमित्त आकाशातून भक्तिभावाचा वर्षाव होणार आहे. जवळा येथील श्री जवळेश्वर मंदिर, नान्नज येथील नंदादेवी मंदिर, चोंडी येथील अहिल्येश्वर मंदिर, चापडगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या चार धार्मिक स्थळांवर गुरुवारी (दि.१०) हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाचा शिरपेच श्री जवळेश्वर मंदिरावर सकाळी होणाऱ्या पुष्पवृष्टीने सजणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते खास हेलिकॉप्टरमधून श्रींच्या पालखी, रथ व मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. ही घटना मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच होत असून,श्रद्धा व आधुनिकतेचा संगम अनुभवण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. या अनोख्या उपक्रमामुळे यात्रोत्सवात नवे सोनेरी पान जोडले जाणार आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री जवळेश्वर रथयात्रेला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात. यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी पहिल्यांदाच हवेतून पुष्पवृष्टीचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. स्थानिक पोलिस प्रशासन व आयोजकांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी ही यात्रोत्सवातील एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे. परंपरा, भक्ती आणि आधुनिकतेचा संगम अनुभवण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.
ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट
जवळेश्वर रथयात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती ग्रामसंस्कृती, भक्ती आणि एकात्मतेचं प्रतीक आहे. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करताना श्रींच्या चरणी माझ्या भावना अर्पण केल्यासारखं वाटणार आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्याला अध्यात्म, परंपरा आणि लोकसंघटनांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. यात्रोत्सवात सहभागी होणं, हे माझ्यासाठी केवळ सन्मान नसून एक आत्मिक समाधान देणारा क्षण आहे.
– प्रा. राम शिंदे, सभापती, विधान परिषद महाराष्ट्र
चार तीर्थक्षेत्रांवर एकाच दिवशी भक्तिभावाचा हवेतून वर्षाव
पारंपरिक यात्रा, नाचगाणी, दिंड्या आणि रथोत्सव यांचा भरगच्च कार्यक्रम सुरू असतानाच हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी यात्रेला वैभव प्राप्त करून देणार आहे. यामुळे केवळ कर्जत-जामखेड नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात या अनोख्या भक्तिसोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे.
रथयात्रेला यंदा अनोखा गौरव
गावाच्या वतीने आम्ही खूप अभिमानित आहोत की पहिल्यांदाच मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. ही फक्त फुलांची वर्षाव नाही, तर श्रींच्या भक्तीचा आणि गावाच्या श्रद्धेचा गौरव आहे. प्रा. राम शिंदे सरांसारख्या मातीतून आलेल्या नेत्याच्या हस्ते हा सोहळा होणं, ही गावासाठी सन्मानाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी एकजुटीने ही यात्रा जपतात आणि सजवतात.
– प्रशांत शिंदे – उपसरपंच, ग्रामपंचायत जवळा