Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून महाराष्ट्रातील भवानी सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांमुळे भवानी सहकारी बँकेतील खातेधारकांना पुढील सहा महिने खात्यामधून पैसे काढता येणार नाहीयेत. तर दुसरीकडे आरबीआयकडून राज्यातील आणखी तीन महत्त्वाच्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने राज्यातील तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. खरंतर आरबीआय देशभरातील सरकारी, सहकारी, खाजगी बँकांवर लक्ष ठेवून असते. एवढेच नाही तर एनबीएफसी कंपन्यांवर देखील आरबीआय चे नियंत्रण असते.

ज्या बँका किंवा एनबीएफसी कंपनी आरबीआयच्या नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून कारवाई केली जात असते. अशातच आता आरबीआयने महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांकडून लाखो रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील या तीन बँकांवर झाली दंडात्मक कारवाई
आरबीआयने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड आणि महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, परळी वैजनाथ या 3 सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यातील सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडकडून 15 लाखांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर या बँकेकडून दीड लाखाचा आणि महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, परळी वैजनाथ या बँकेकडून 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता आपण या तीनही बँकांवर दंडात्मक कारवाई होण्याची नेमके कारण काय याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत तसेच याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार याची सुद्धा माहिती पाहणार आहोत.
दंडात्मक कारवाईचे कारण काय ?
आरबीआयने सांगितल्याप्रमाणे सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेडने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 च्या सेक्शन 5 (सीसीव्ही) (iii) आणि सेक्शन 56 या नियमांचं उल्लंघन केले होते आणि यामुळे या बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आरबीआयच्या लोन अँड अॅडव्हानसेस टू डायरेक्टर्स, रिलेटीव्ह अँड फर्म्स संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पूर्तता न केल्यानं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महेश अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने आरबीआयच्या ‘एक्पोझर नॉर्म्स अँड स्टॅट्युटरी / ऑदर रिस्ट्रिक्शन्स-यूसीबी आणि इतर मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केलेली नव्हती आणि यामुळे या बँकेवर दंडात्मक कारवाई झालेली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
आरबीआय कडून झालेल्या दंडात्मक कारवाईचा सदरील तीनही बँकेच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. ही कारवाई बँकेवर करण्यात आली असून दंडाची रक्कम देखील बँकेकडून वसूल केली जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या कारवाईमुळे बँकेच्या बँकिंग व्यवसायावर कोणताच प्रभाव पडणार नाही. बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहारावर आरबीआयच्या या दंडात्मक कारवाईचा कोणताच असर होणार नाही. यामुळे ग्राहकाने काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन जाणकारांकडून करण्यात आले आहे.