अहिल्यानगर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे दि.२७ जुलै रोजी पुतळ्याचे अनावरण करण्याचा निर्णय गुरूवारी दि.१० शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेतला. अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्यावतीने करण्यात आली.
ही मागणी मान्य झाली व जुन्या पुतळ्याशेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सशोभीकरण करण्यात आले व डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आला. मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे.

त्यामुळे ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली असून संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांनी गुरुवारी १० जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे समाजबांधवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी येणाऱ्या २७ लाच पुतळ्याचे अनावरण होणार असून कार्यक्रमाची रूपरेषा ही समाज ठरवेल व कार्यक्रमाला कोणताही प्रकारचे गालबोट लागल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार असेल. या कार्यक्रमांमध्ये फक्त निळा पंचा सोडून इतर ध्वज घेऊन येणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.