2025 हे वर्ष सिनेसृष्टीसाठी थरारक ठरले आहे आणि याची साक्ष म्हणजे IMDb ने नुकतीच जाहीर केलेली या वर्षीच्या आतापर्यंतच्या टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपटांची यादी. या यादीत अशा चित्रपटांचा समावेश आहे जे केवळ बॉक्स ऑफिसवर गाजले नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनातही कायमची जागा मिळवून गेले. ऐतिहासिक कहाण्या, वास्तवावर आधारित प्रसंग, राजकीय थ्रिलर आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कथांनी या यादीत स्थान पटकावले आहे.
छावा टॉपवर

या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झालेला चित्रपट म्हणजे छावा. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक साकारला असून, विकी कौशलने यात प्रभावी भूमिका निभावली आहे. फक्त 130 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट तब्बल 809 कोटींची कमाई करत सुपरहिट ठरला.
ड्रॅगन
दुसऱ्या क्रमांकावर आहे एक तामिळ स्लीपर हिट ड्रॅगन. प्रदीप रंगनाथन आणि गोपिका रमेश यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट सुरुवातीला फारसा प्रसिद्ध नव्हता, मात्र प्रेक्षकांच्या पसंतीने आणि समीक्षकांच्या प्रशंसेने याला 150 कोटींहून अधिक कमाई करून दिली. त्याची कथा आणि संगीत प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले.
देवा
तिसऱ्या क्रमांकावर असलेला देवा हा शाहिद कपूरचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भले फारसा कमाल करू शकला नाही, मात्र IMDb च्या यादीत त्याने जागा मिळवली, म्हणजे प्रेक्षकांनी त्याच्या आशयावर विश्वास दाखवला आहे. त्याच्या पटकथेतील वेगळेपणा आणि अभिनयाची खोली यामुळे त्याला ही लोकप्रियता मिळाली.
रेड 2
चौथ्या स्थानावर आलेला रेड 2 हा अजय देवगन आणि रितेश देशमुख यांचा थरारक चित्रपट आहे, ज्यात सामाजिक अन्याय आणि कायद्याच्या लढ्याची कहाणी प्रभावीपणे मांडली गेली आहे. तर पाचव्या स्थानावर ‘रेट्रो’ नावाचा एक असा चित्रपट आहे जो 1980 च्या दशकात घेऊन जातो आणि त्या काळातील जीवनशैलीची व सांस्कृतिक चित्रं प्रेक्षकांसमोर मांडतो.
द डिप्लोमॅट
त्यानंतरच्या स्थानावर आलेला द डिप्लोमॅट या चित्रपटाने एक सत्य घटना सिनेमॅटिक रुपात मांडली. उज्मा अहमद या भारतीय महिलेला पाकिस्तानातून परत आणण्यासाठी भारत सरकारने केलेले प्रयत्न आणि त्यामागील भावनिक घडामोडी यामुळे या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले.
एम्पुरन आणि सितारे जमीन पर
एम्पुरन हा 2019 च्या ब्लॉकबस्टर लुसिफरचा सिक्वेल असून मोहनलालने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाला जीव दिला. याचबरोबर सितारे जमीन पर या चित्रपटानेही हळुवार, मानवी भावनांना भिडणारी कथा सांगून प्रेक्षकांचे मन जिंकले.
केसरी 2
नवव्या क्रमांकावर केसरी 2 याने जालियनवाला बाग हत्याकांडानंतरची कोर्ट-कचेर्यांची कहाणी आणि ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या वकिलाची शौर्यगाथा सादर केली. अक्षय कुमारच्या प्रगल्भ भूमिकेमुळे हा चित्रपट देखील चर्चेत राहिला.
विदामुयार्ची
या यादीचा शेवट होतो विदामुयार्ची या अजित कुमार आणि त्रिशा कृष्णनच्या अभिनयाने सजलेल्या तमिळ चित्रपटाने. एक हॉलिवूड थ्रिलरवर आधारित असलेला हा सिनेमा दक्षिण भारतीय सिनेमाचं ताकदीचं उदाहरण ठरतो.