वळण- राहुरी तालुक्यातील मानोरी येथील मुळा नदीवरील बंधारा आणि लगतचा पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून, आता या कामाचा प्रशासकीय तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळा पाटबंधारे विभागाकडून या कामाची जबाबदारी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आली असून, यामुळे पूर्वीचे सर्व प्रस्ताव आपोआपच रद्द झाले आहेत.
बंधाऱ्याचा समावेश आता उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये म्हणजे बॅरेज प्रकारात करण्यात आला आहे आणि जलसंपदा विभागाने नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे.

राहुरी तालुक्यातील मानोरी- केंदळ खुर्द दरम्यान मुळा नदीवर असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व त्यालगतचा पूल गेल्या ९ वर्षांपासून दुरुस्तीअभावी पडून आहे. मुळा पाटबंधारे विभागाने एकदा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र त्यानंतर पुलाची पुन्हा मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यामुळे त्या निधीत काम होऊ शकले नाही आणि तो निधी परत गेला. त्यानंतर सुधारित ४ प्रस्ताव पाठवले गेले. दरम्यान, ३ ते ४ वर्षांचा कालावधी खर्ची पडला. आता अखेर या बंधाऱ्याचा प्रकल्प जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाने या बंधाऱ्याचे उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये रूपांतर केले आहे. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूने ४ ते ५ मीटर वर नवीन बांधकाम करून पाणी साठवणूक वाढवण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण सुरू आहे. या कामासाठी नव्याने सर्वेक्षण, डिझाईन, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष कामासाठी सुमारे १ ते १.५ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानोरी व केंदळ परिसरातील ग्रामस्थांना रस्ता आणि पुलासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मात्र हे काम जलसंपदा विभागाकडे वर्ग झाल्यामुळे आणि हे खाते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अखत्यारीत असल्याने ग्रामस्थांना काम मार्गी लागण्याबाबत विश्वास वाटत आहे.
सध्याच्या बंधाऱ्याच्य पूर्व बाजूने ४ ते ५ मीटर रुंदीकरण होऊन काम पूर्ण झाल्यास रस्ता व पूल सरळ होईल आणि वाहतुकीस त्याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय उच्च पातळी बंधारा झाल्यामुळे पाणी साठवणूक क्षमताही वाढून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे.