आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका, पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

Published on -

करंजी- आपल्या जीवनाला योग्य दिशा आणि मार्ग दाखवणारे पहिले गुरू म्हणजे आई-वडील, त्यामुळे गुरुपौर्णिमेला आई वडिलांचे पूजन महत्त्वाचे असून, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आई वडिलांबरोबरच शाळा, शिक्षक आणि पुस्तकावर प्रेम करा. शिक्षण घेताना आई-वडिलांकडे क्षणभर बघत जा. मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका तर आई-वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी उच्च शिक्षण घ्या, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खाडे यांनी गुरुवारी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर ढोले होते प्रमुख मान्यवर म्हणूनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य सोमनाथ झाडे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, ज्येष्ठ नेते राजेंद्र तागड, शिवसेनेचे भागिनाथ गवळी, बंडू झाडे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

या वेळी पोलीस उपाधीक्षक खाडे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवनींणा उजाळा देताना सांगितले की, मी ऊस तोडणी मजुराचा मुलगा आहे. माझ्या आई-वडिलांनी ऊस तोडणी करून मला शिक्षण घेण्यासाठी हातभार लावला. त्याच वेळी आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने अभ्यास करत गेलो आणि गुणवंत विद्यार्थ्यांची मैत्री केली.

पुस्तकांवर प्रेम केलं आणि आई-वडिलांनी ऊस तोडणी करू नये, यासाठी रात्रंदिवस अभ्यास केला, अधिकारी झालो आणि आई-वडिलांना सुखाचे दिवस आणले. प्रत्येक बापाला आपल्या मुला मुलीकडून हीच अपेक्षा असते आणि म्हणूनच आई-वडील आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी अपार कष्ट करतात, त्या कष्टाची जाणीव फक्त शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे, असे उपअधीक्षक खाडे म्हणाले. प्रास्ताविक शिक्षक उत्तम कटके यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना शिरसाट यांनी केले. डी.
डी. बडे आभार यांनी मानले.

चिचोंडी येथील एमआयटी कॉलेजमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील खाडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल ताशाच्या गजरात खाडे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्राचार्य बालाजी घुगे यांनी केले. या वेळी प्रा. रमेश कामुनी, अमोल मांडवकर, गणेश निकम, अक्षय आहेर, प्रा. शुभांगी दिवटे, प्रा. रामेश्वर झाडगे, शुभम शिंदे, सतीश मोरकर, मयूर तोडमल, शिक्षिका वैशाली थोरात, शिक्षिका दिपाली आव्हाड, शिक्षिका जयश्री जऱ्हाड, आदिनाथ पालवे सर, अंबादास आव्हाड, आकाश टाकरस, बंडू आव्हाड, सचिन आव्हाड, श्रीमती रुक्मिणी गिते, डॉ. गोरक्ष गीते, सुरेश गीते यांच्यासह चिचोंडी शिराळ येथील पालक उपस्थित होते.

२२ दिवसात केलेली कारवाई

पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी त्यांच्या विशेष पथकाच्या माध्यमातून २२ दिवसात नगर जिल्ह्यात गुटखा, मावा, जुगार, मटका, गोहत्या, यावर केलेल्या विशेष कारवाईच्या माध्यमातून ४० केसेस दाखल केल्या असून, तीन कोटी २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २५० आरोपीवर गुन्हे दाखल केले. जिल्ह्यातील भाईगिरी, दादागिरी करणाऱ्यांसह अवैधधंदे करणाऱ्यांना पोलीस कारवाईचा हिसका दाखवला जात असल्याचे उपअधीक्षक संतोष खाडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!