शिर्डी- ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डी परिसरातून जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एजंटगिरी व सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत, अशी माहित माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
ग्रो मोअर प्रकरणी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, जवळपास ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, यामध्ये ११०० नागरिकांनी पैसे गुंतवले आहेत. त्यात ७० टक्के कर्मचारी हे साईबाबा संस्थानचे आहेत. विशेष म्हणजे गुंतवणूक करताना एजंटगिरी करणाऱ्या चौघा जणांचा संस्थानच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले की, झटपट श्रीमंत होण्याच्या योजनांमध्ये नागरिक अजूनही अडकतात, हे दुर्दैवी आहे. याआधीही अशा अनेक स्कीममुळे लोकांचे पैसे बुडाले असूनही नागरिक अजूनही अशा आमिषांना बळी पडतात. ही योजना सुरूवातीला आकर्षक वाटते, परंतु नंतर अडचणीत आणते. शिर्डीतही हेच झाले.
ज्यांनी सुरुवातीला पैसे गुंतवले, त्यांना नफा मिळाला आणि त्यांनी त्यातून बंगले व गाड्या घेतल्या, त्यामुळे इतर नागरिकही या जाळ्यात अडकले. या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी स्वतःहून निर्णय घेऊन गुंतवणूक केली, कोणी त्यांना जबरदस्ती केली नव्हती. यामुळेच जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागेल. मात्र, नागरिकांचे नुकसान भरून येण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्नशील राहू.
पैसे मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, लवकर तोडगा निघणे अशक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी या गुंतवणुकीच्या माध्यमातून सावकारी केली, त्यांच्यावर दहा दिवसांत कठोर कारवाई होताना दिसेल, असेही त्यांनी सांगितले. हे संपूर्ण रॅकेट केवळ नंदुरबारपुरते मर्यादित नसून, अनेक भागांमध्ये नागरिकांनी परस्पर विश्वासावर पैसे गुंतवले असल्याचे त्यांनी सांगितले.