भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, या परिसरात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे यांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ३१ दिवसांपासून अव्याहतपणे कोसळत असलेल्या पावसामुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना भात पेरणी करणे शक्य झाले नाही, तर ज्यांनी पेरणी केली, त्यांची भात रोपे वाढण्याआधीच पाण्याखाली गेली व सडली. परिणामी, या भागातील भात शेती देशोधडीला लागली आहे.

सुनिताताई भांगरे यांनी नुकतीच कृषी अधिकाऱ्यांसह भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या मुरशेत, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, घाटघर, सम्राद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष भात पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेल्या हानीचे चित्र स्पष्टपणे मांडले.
या भागातील शेतकऱ्यांनी महागडे भाताचे बी खरेदी करून पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे बीज वाया गेले असून, आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सुनिताताई भांगरे यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा व भात पिकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरीत करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
या पाहणीवेळी राजू अस्वले, रमेश बांगर, प्रकाश उघडे, पांडुरंग उघडे, चंदर बांडे, एकनाथ बांडे, कैलास इदे, राजू इदे, निंबा बुळे, कीर्तीताई गिर्हे, कुशाबा पोकळे, अर्जुन खोडके, रावजी मधे, गंगाराम गिर्हे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी देशमुख, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.