राहुरी- राहुरी शहरात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी तात्काळ हालचाल करत दोन जणांना ताब्यात घेतले असून, जवळपास ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक १० जुलै २०२५ रोजी सकाळच्या सुमारास राहुरी शहरातून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली. गोटुंबे आखाडा परिसरात होंडा कंपनीच्या शाईन मोटारसायकलवरून देशी दारूची चोरटी वाहतूक करणारे दोन इसम पोलिसांच्या हाती लागले.
आकाश भाऊसाहेब लेकुळे (वय २५ वर्षे, रा. शनी चौक, राहुरी), सुनील विठ्ठल जगधने (रा. देसवंडी, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून एकूण ७६८० रुपये किमतीची देशी दारू व ८० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, असा एकूण ८७हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राहुरी पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे, सतीश आवारे, पोलीस नाईक गणेश सानप, कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट, पोलीस हवालदार शकूर सय्यद यांनी भाग घेतला.