Pune News : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी अवघड बनली आहे. राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात अलीकडे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
हिंजवडी आणि मुळशी सारख्या भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. हिंजवडी बाबत बोलायचं झालं तर येथे मोठमोठ्या आयटी कंपन्या आहेत. आयटी कंपन्यांमुळे येथे दररोज हजारो कर्मचारी कामाला येतात.

यामुळे या भागातील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातल्या त्यात या भागातील रस्ते सध्याच्या वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दरम्यान, या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा या अनुषंगाने शासनाकडून आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
वाहतूक कोंडी दूर व्हावी म्हणून मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. पण मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. पण भविष्यात ही सर्व कटकट दूर होणार आहे. भविष्यात या भागांना मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे शिवाय येथील रस्ते देखील आता मजबूत केले जाणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या भागात तीन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. दरम्यान आता आपण याच तीन रस्ते प्रकल्पांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे तयार होणार नवीन रस्ते ?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हिंजवडीत आणि मुळशी तालुक्याच्या एमआयडीसी परिसरात नवीन रस्ते तयार केले जाणार आहेत.
म्हाळुंगे ते हिंजवडी फेज 1 यादरम्यान दीड किलोमीटर लांबीचा नवा रस्ता तयार केला जाईल, हा रस्ता 36 मीटर रुंदीचा राहणार आहे आणि या रस्त्यासाठी 13.05 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यासोबतच ठाकर वस्ती ते मान गावठाण यादरम्यान 2.40 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता तयार केला जाईल, या रस्त्यासाठी 20.88 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती दरम्यान 3.50 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार असून यासाठी 30.45 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान या तीनही प्रकल्पांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. नक्कीच हे तिन्ही रस्ते तयार झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.