आजच्या युगात जिथे पैशाची गरज अचानक आली, तिथे क्रेडीट कार्ड झटपट कामी येते. पण या कार्डांमागचं खरं गूढ हे त्यांच्यावर असलेल्या Visa, MasterCard किंवा RuPay या नावांमध्ये लपलेलं असतं. ही नावं फक्त लोगो नाहीत, तर त्यांच्यामागे संपूर्ण एक यंत्रणा असते. अनेकदा ग्राहकांना कळतंच नाही की कोणतं कार्ड निवडावं, कुठलं अधिक फायदेशीर ठरेल, आणि कुठल्या माध्यमातून त्यांना जास्त पॉइंट्स, ऑफर्स किंवा रिवॉर्ड्स मिळतील. आता भारतीय रिझर्व्ह बँकेनेही हे ओळखून एक मोठा निर्णय घेतला आहे, ग्राहकांना कार्ड निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे.
सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेल्या या नव्या नियमानुसार, आता कोणतं कार्ड वापरायचं हे ठरवण्याचा निर्णय बँकेकडे न राहता थेट ग्राहकांच्या हातात दिला गेलाय. आधी बँका आपापल्या सुविधेनुसार कोणतंही नेटवर्क असलेलं कार्ड ग्राहकांना देत असत, पण आता ग्राहक स्वतः ठरवू शकतात की त्यांना RuPay हवं, की Visa, की MasterCard. ही निवड करताना मात्र काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक कार्डाच्या मागचं धोरण वेगळं आहे.

RuPay कार्ड
RuPay कार्ड हे भारतात तयार झालेलं, आपल्याच देशात विकसित झालेलं एक पेमेंट नेटवर्क आहे. याचा अर्थ असा की RuPay कार्ड फक्त भारतातच वापरता येतं. हे कार्ड खास सरकारी योजना, सामान्य व्यवहार आणि कमी शुल्कासाठी उपयुक्त आहे. यातून तुम्हाला कमी ट्रान्झॅक्शन फी लागते, बँका अनेक वेळा ऑफर्सही देतात, आणि अनेक सरकारी सबसिडी किंवा स्कीम्ससाठी हे कार्ड उपयुक्त ठरतं. मात्र त्याचवेळी, जर तुम्हाला परदेशात ट्रॅव्हल करायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचे असतील, तर RuPay फारसा उपयोगी नाही.
Visa आणि MasterCard
दुसरीकडे Visa आणि MasterCard या परदेशी कंपन्या आहेत, आणि जगभरात त्यांचं नेटवर्क जबरदस्त आहे. Visa हे आज जगातील सर्वात मोठं पेमेंट नेटवर्क मानलं जातं, तर MasterCard दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही कार्डांमधून तुम्ही कुठंही सहज व्यवहार करू शकता. त्याशिवाय, हे कार्ड वापरणाऱ्यांना अनेक प्रकारचे पॉइंट्स, कॅशबॅक, ट्रॅव्हल किंवा डाइनिंग ऑफर्स मिळतात. काही प्रीमियम कार्डांमध्ये तर एअरपोर्ट लाउंजपासून वैयक्तिक सेवाही मिळते. अर्थात, हे फायदे मिळवण्यासाठी त्यावर लागणारं वार्षिक शुल्क थोडं जास्त असतं.
काही ग्राहकांचा प्रश्न असतो की कोणतं कार्ड रिवॉर्ड्सच्या दृष्टीने जास्त फायदेशीर आहे? तर उत्तर थोडंसं तुमच्या वापरावर अवलंबून आहे. जर तुम्ही फक्त भारतात व्यवहार करणारे, कमी खर्च करणारे आणि सरकारी योजनांचे लाभ घेणारे ग्राहक असाल, तर RuPay तुम्हाला योग्य ठरेल. पण जर तुम्ही खरेदी, प्रवास आणि ऑनलाइन डील्समध्ये सक्रिय असाल, तर Visa किंवा MasterCardमधून तुम्हाला चांगले पॉइंट्स आणि कॅशबॅक मिळतील.
‘Centurion Card’ अर्थात ‘Black Card’
याच संदर्भात, जगातील सर्वात महागडं आणि खास कार्ड म्हणजे American Express चं ‘Centurion Card’ अर्थात ‘Black Card’. हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी नाही. फक्त अब्जाधीश लोकांनाच खास आमंत्रणाद्वारे हे कार्ड दिलं जातं. भारतात केवळ 200 लोकांकडे हे कार्ड आहे, आणि त्याच्या क्रेडिट लिमिटची मर्यादा थेट 10 कोटी रुपयेपर्यंत पोहोचते. हे कार्ड म्हणजे केवळ आर्थिक साधन नाही, तर एक स्टेटस सिम्बॉलसुद्धा आहे.