अहिल्यानगर- ग्राम विकास विभागाच्या बनावट शासन निर्णय दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असता पुन्हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ग्रामविकास विभागाचा बनावट निर्णय दाखवून कामे मंजूर केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या अभियंता सुप्रिया गोरखनाथ कांबळे (वय २९, रा. चंद्र बिल्डिंग, गोविंदपुरा, अहिल्यानगर) यांनी फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील वाकोडी, बुऱ्हाणनगर, देऊळगाव सिध्दी, कामरगाव, चास, बाबुर्डी बेंद या गावातील ४५ कामांचा समावेश असलेल्या ६.९५ कोटींच्या निधी मंजुरीचा शासन निर्णय ३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढल्याची झेरॉक्स प्रत अक्षय चिर्के याने ४ ऑक्टोबर रोजी बांधकाम विभागाच्या कार्यालयात अभियंता चव्हाण यांना आणून दिली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता विद्युत विभागाकडून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने बनावट आदेशाची प्रत आणून दिली. त्यानुसार अभियंता कांबळे यांनी सात कामाच्या जागेची अज्ञात व्यक्ती समवेत पाहणी करून अंदाजपत्रके तयार केली.
त्यास विभागीय कार्यालयाकडून तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रक्रिया राबवली व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यातील एका कामाचे ९.९० लाखाचे देयक नोंदवून निधी मागणीसाठी एलपीआरएस प्रणालीवरून ऑनलाईन पध्दतीने ग्रामविकास विभागाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर सदरचा निधी मंजुरीचा शासन निर्णयच बनावट असल्याचे समोर आले. ग्राम विकास विभागाने ४ जुलै रोजी पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.