करंजी- पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम विविध गाव वाडी वस्तीवर सुरू आहे. मात्र काही ठिकाणी आयएसआयट्रेड मार्क असलेले पाईप वापरले जात आहेत तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले व वेल्डींगने जॉईंट केलेले पाईप वापरले जात आहेत.
या मुख्य पाईपलाईनसाठी ठेकेदाराकडून काही ठिकाणी निकृष्ट पाईपचा वापर केला जात आहे का असा प्रश्न नागरिकांमधून उस्थितीत केला जात आहे.

पाथर्डी तालुक्यातील आठरे कौवडगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गंजलेली व मातीत पुरण्याआधीच गंज पकडुन काही पाईप फुटलेले आहेत. मिरी तिसगाव चिचोंडी करंजी परिसरात या योजनेचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. थातूरमातूर पद्धतीने सध्या काम उरकून घेण्याची घाई ठेकेदारांकडून सुरू असून ही योजना भविष्यात चालेल की नाही असा प्रश्न सर्वसामान्य वर्गातून आत्ताच उपस्थित केला जात आहे.
जर अशा पद्धतीने लाभधारक गावांच्या डोळ्यात धुळफेक करणारे कामे संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून केली जाणार असतील तर या योजनेचे पाणी नव्याने समाविष्ट केलेल्या गाव वाडी वस्तीवरील नागरिकांना खरोखरच मिळणार का असा देखील प्रश्न आता अनेक लाभधारक नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
जल जीवन योजनेअंतर्गत गाव वाडी वस्तीवर नवीन पाईपलाईन खोदण्याचे व पाईप टाकण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचे अर्धवट ही काम आहे, मात्र या योजनेसाठी ठीक ठिकाणी साठवून ठेवलेले पाईप फुटलेल्या अवस्थेत आहेत. हे पाईप फुटले का कोणी फोडले. कोण करतय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याचा देखील तपास जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे.