अहिल्यानगर- जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायिकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. यासाठी एसपींनी स्वतःचे विशेष पथक नियुक्त केले आहे. हे विशेष पथक अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सध्या चांगलाच धडा शिकवत आहे, परंतु या विशेष पथकात अनेक वेळा कारवाई दरम्यान महिला पोलीस नसल्याने गुन्हेगारांवर कारवाई करताना या पथकाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे या पथकाने कारवाईदरम्यान महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यवसायिकांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी स्वतःचे विशेष पोलीस पथक तयार करून वाळू, गुटखा, दारू, गांजा यांसारख्या नशेच्या पदार्थांच्या विक्रेत्यांवर दररोज कारवाया सुरू केल्या आहेत. प्रशिक्षणार्थी डीवायएसपी संतोष खाडे हे या विशेष पथकाचे प्रमुख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी, राहुरी, शेवगाव, कोपरगाव आणि नेवासा येथे जोरदार कारवाई करण्यात आली आहे.

अशा कारवाया करताना अनेक वेळा महिला गुन्हेगारांवर कारवाई करताना महिला पोलीस नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या पथकात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. महिला गुन्हेगारांवर कारवाई करताना कायदेशीर आणि नैतिक दोन्ही स्तरांवर काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे विशेष पथकात महिलांची उपस्थिती ही वेळेची गरज आहे.
सध्या एलसीबीमध्ये दोन पोलिसांच्या नियुक्तीवरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात एलसीबीची सूत्रे कोणाच्या ताब्यात जाणार यावर चर्चा सुरू आहे. एक जुना कर्मचारी राजकीय नेत्यांच्या आणि वरिष्ठांच्या माध्यमातून पुन्हा एलसीबीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहे.
त्यामुळे मागील काळातील वादग्रस्त कारभार, चुकीचे व्यवहार आणि साठवलेली माया यावर नव्या पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही अवैध व्यवसायिकांनी कारवाईनंतर एलसीबीतील कर्मचाऱ्यांचे वादग्रस्त व्हिडिओ पोलीस अधीक्षकांकडे पाठवले असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस पथक प्रचंड आश्वासक कामगिरी करत आहे.
महिला पोलिसांची गरज ओळखून भविष्यात कारवाईदरम्यान त्यांचा समावेश होणे अपेक्षित आहे. दरम्यान, सामान्य जनतेकडून एलसीबीचा कारभार प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
गरजेनुसार महिला कर्मचारी पथकात दाखल
“जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकामध्ये कोणत्याही पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती केली जात नाही. गोपनीयतेसाठी कर्मचाऱ्यांची बदल करण्यात येते. कोणत्याही पोलिसाची मक्तेदारी होणार नाही याकडे लक्ष दिले जाते. तपासासाठी जिथे महिला पोलिसांची आवश्यकता असते तिथे महिला कर्मचारी सोबत घेतले जातात,” असे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी व विशेष पथक प्रमुख संतोष खाडे यांनी सांगितले.
एलसीबीची सूत्रे कुणाच्या ताब्यात राहणार
एलसीबीमध्ये पुन्हा येण्यासाठी एक जुना कर्मचारी राजकीय व वरिष्ठ पाठबळावर प्रयत्न करत आहे. त्यामुळे एलसीबीचा कारभार पारदर्शकपणे आणि जनतेच्या हितासाठी पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ देखील पोलीस अधीक्षकांकडे पोहोचल्याचे बोलले जाते.