श्रीगोंदा तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या आरोपींना न्यायालयाने सुनावली ५ दिवसांची पोलिस कोठडी

Published on -

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्म वरून ७३ लाख ५० हजार रुपयांच्या केलेल्या फसवणूक प्रकरणातील रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर या अटक आरोपींच्या गाड्या तसेच जमिनी जप्त करावयाच्या असल्याच्या कारणातून न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कर्जत तालुक्यातील नितीन अंबादास गांगर्डे यांनी शेअर बाजारात इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळत असल्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्या प्रकरणी इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मच्या १२ संचालकांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी या प्रकरणात रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर या दोघांना अटक करत श्रीगोंदा न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना दि.११ जुलै पर्यंत सुनावलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना शुक्रवारी दि.११ रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या बाजूने वकिलांनी युक्तीवाद करत जामीन मिळण्याची मागणी केली.

मात्र पोलिसांनी आरोपींनी फसवणुकीच्या रकमेतून दुचाकी, चारचाकी तसेच जमीन खरेदी केली असल्याची फिर्यादी याने माहिती दिली असल्याचे न्यायालयाला सांगत सदर दुचाकी चारचाकी तसेच जमीन जप्त करायचे बाकी असल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या मागणीवरून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणात नवनाथ जग्गनाथ अवताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे, संदीप दरेकर हे गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच पसार झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!