राहाता- तालुक्यातील वाकडी गावातील महाराष्ट्र बँकेचे चितळी येथे होणारे स्थलांतर अखेर थांबले असून, शेतकरी, व्यापारी, विविध खातेदार, महिला बचतगट, लाभार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या महिन्यांपासून काही वाकडीतील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ चितळी येथे स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र गावातील दक्ष आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि यशस्वीपणे बँक गावातच टिकवून ठेवण्यात यश मिळवले.

गावातील सुज्ञ नागरिक, शेतकरी, व्यापारी, तसेच वाकडी ग्रामपंचायतीने वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार करून बँक स्थलांतरास विरोध केला. नगर येथील क्षेत्रीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन विनंती अर्ज करण्यात आले. मात्र बँक स्थलांतरास अवघे चार दिवस शिल्लक असताना, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि व्यापारी आण्णासाहेब कोते यांनी अंतिम प्रयत्न म्हणून आमदार आशुतोषदादा काळे यांच्याशी संपर्क साधला.
आ. आशुतोषदादा काळे यांनी बँकेच्या गरजेविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी तातडीने महाराष्ट्र बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वाकडी येथील बँक स्थलांतर तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या निर्णयामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, तसेच वाकडी ग्रामपंचायत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशस्वी प्रयत्नांनंतर ग्रामस्थांनी महाराष्ट्र बँकेसमोर फटाके फोडून पेढे वाटत आनंद व्यक्त केला.
आण्णासाहेब कोते, बाबासाहेब शेळके, रविंद्र शेळके, प्रगतशील शेतकरी रमेश लहारे यांनी नगर येथील क्षेत्रीय व्यवस्थापक शशांक साहू यांची भेट घेऊन चर्चा केली आणि स्थलांतर थांबवण्यास लेखी विनंती अर्ज सादर केला.
खातेदारांची जबाबदारी वाढली
वाकडी येथील बँकेचे स्थलांतर सध्या सहा महिन्यांसाठी थांबविण्यात आले आहे. ग्रामस्थांची आणि खातेदारांची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. शाखेची आर्थिक स्थिती मजबूत करणे गावकऱ्यांच्या हातात आहे. नियमित व्यवहार आणि कर्जाची परतफेड करून बँकेला सहकार्य करणे आवश्यक आहे. आपल्या बँकेला कायम गावात ठेवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
– शशांक साहू, क्षेत्रीय व्यवस्थापक, अहिल्यानगर