अहिल्यानगर : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांत सुमारे ७० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दुप्पट आहे. भंडारदरा धरणात सध्या ६९.४५ टक्के, निळवंडे धरणात ८२ टक्के, मुळा धरणात ७० टक्के पाणीसाठा आहे.
दरम्यान, आढळा, सीना व विसापूर ही धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्ह्यात आतापर्यंत १०७ मिमीवर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, अद्यापही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणांत ७ हजार ६६८ दशलक्ष घनफूट म्हणजे ६९.१४ टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी याच दिवशी भंडारदरा धरणांत ३६६८ दलघफू म्हणजे ३३.२३ टक्के पाणीसाठा होता. आठ टीएमसीच्या निळवंडे धरणात सध्या ६ हजार ९०१ दलघफू म्हणजे ८२.९४ टक्के पाणीसाठा आहे.
मागील वर्षी याच दिवशी निळवंडेत १२५१ दलघफू म्हणजे १५.०४ टक्के पाणी होते. २६ टीएमसीच्या मुळा धरणात सध्या १८ हजार २२६ दलघफू म्हणजे ७०.१० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी मुळा धरणात ७६९३ दलघफू म्हणजे २९.५९ टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धरणांत दुप्पट पाणीसाठा आहे. १०६० दलघफू क्षमतेचे आढळा धरण शंभर टक्के भरले आहे. तसेच २४०० दलघफू क्षमतेचे सीना धरण व ९०५ दलघफू क्षमतेचे विसापूर धरण तुडुंब भरले आहे.