Maharashtra Expressway News : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका रस्ते विकासाच्या प्रकल्पाची भेट मिळणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. खरंतर यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील प्रवास वेगवान व्हावा या अनुषंगाने या द्रुतगती महामार्गावर एक नवीन मार्गिका विकसित केली जात आहे. या महामार्गावर विकसित होणारी मिसिंग लिंक ही 19.80 किलोमीटर लांबीची असून याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.
काय आहे नवीन अपडेट ?
मिसिंग लिंक प्रकल्पाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार असल्याचे सांगितले तसेच या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानच्या प्रवासाचे अंतर 30 मिनिटांनी म्हणजेच अर्ध्या तासाने कमी होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका तयार केली जात आहे. ही 19.80 किलोमीटर लांबीची नवीन मार्गिका असून या प्रकल्पात देशातील सर्वाधिक लांबीचा आणि आशियातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा देखील तयार होतोय.
या नव्या प्रकल्पामुळे महामार्गावरील घाट सेक्शनला बायपास करता येणे शक्य होणार आहे. परिणामी या महामार्गावरील वाहतूक जलद होईल आणि प्रवास अंतर कमी होईल अशी आशा आहे. या नव्या प्रकल्पामुळे महामार्गावरील घाट सेक्शन मध्ये होणारी अपघातांची भीती देखील कमी होणार आहे.
दरम्यान या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 94% काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम देखील जलद गतीने सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम पूर्ण केले जात आहे. महत्वाची बाब अशी की राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प डिसेंबर महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे टार्गेट ठेवलेले आहे.
यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण करावे जेणेकरून डिसेंबर मध्ये हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला करता येईल अशी सूचना देखील दिली आहे. यामुळे आता हा प्रकल्प डिसेंबर अखेरीस खुला होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.