भंडारदरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा पर्यटनस्थळी पर्यटकांकडून शांततेला गालबोट लावणारे प्रकार वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राजुर पोलिसांनी पर्यटकांना ‘मस्तीत जगा, पण शिस्तीत वागा’ असा इशारा देत कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
निसर्ग पर्यटनासाठी शिस्त आवश्यक भंडारदरा हे निसर्ग सौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ असून येथे येणाऱ्या पर्यटकांनी नैसर्गिक सौंदर्याचा आदर राखावा. मद्यप्राशन, उच्छाद, आणि असभ्य वर्तन केल्यास यामुळे पर्यटनस्थळी गालबोट लागते. प्रशासनाने याबाबत नियमावली कटोरपणे राबवावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अलीकडच्या काळात काही पर्यटक मद्यप्राशन करून धांगडधिंगा करतात, साऊंड सिस्टिम लावून रस्त्यावर नाचतात आणि रस्त्यावरच मद्याच्या बाटल्या फोडतात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विरोध करणे, त्यांच्यावर दमदाटी करणे, तसेच समजावण्यास आलेल्या महिलेशी अर्वाच्य भाषेत बोलणे असे प्रकार घडू लागले आहेत.
दोन दिवसांपूर्वी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एका धबधब्याजवळ मद्यधुंद पर्यटकांनी अक्षरशः नंगानाच करत इतर पर्यटकांना त्रास दिला. या प्रकाराला कंटाळून स्थानिकांनी हस्तक्षेप केला आणि पर्यटकांना रोखले.
अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील भंडारदरा हे पर्यटनस्थळ निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी लवकरच पावसाने हजेरी लावल्यानंतर धबधब्यांची मालिका सुरू झाली असून, महाराष्ट्रासह परराज्यांतून येथे मोठ्या प्रमाणावर दाखल होत मात्र काही पर्यटक आहेत. भंडारदरा परिसरातील स्थानिक नागरिक सततच्या या त्रासामुळे संतप्त आहेत. त्यांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करत या असभ्य पर्यटकांवर कारवाईची मागणी केली आहे.
पर्यटकांचे वर्तन निसर्ग पर्यटनाच्या सौंदर्यावर पांढरा डाग उमटवू लागले आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने राजुर पोलिसांनी याबाबत अधिक कडक भूमिका घेतली आहे. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी सांगितले की, ‘पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र शिस्तीत व कायद्याचे पालन करून. कायदा मोडणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.’