MSRTC Bus : एसटीला पांडुरंग पावला ! वारीत ५२०० जादा गाड्या, एसटीला मिळाले ३५ कोटी

Published on -

पंढरपूर येथे नुकतीच आषाढी एकादशी लाखो वारकऱ्यांचा साक्षीने साजरी झाली. देशभरातून पायी, रेल्वे, एसटी, खासगी वाहनांनी भाविकांनी पंढरपूर गाठत विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा एसटी गाड्यांच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडवले. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. या भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५२०० जादा गाड्या सोडल्या होत्या. ३ जुलै ते ९ जुलैदरम्यान या बस गाड्यांनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली.

यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले. जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजारांनी जास्त आहे. (२०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते.) एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडवून आणणाऱ्या हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांचे परिवहन मंत्र्यांनी अभिनंदन केले.

विशेष म्हणजे आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्वखर्चातून ५, ६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाश्त्याची सोय केली होती. याचा लाभ एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!